
‘सुधारित पाणी पुरवठा योजने’साठी आवश्यक असलेले मुळा धरण येथील राहुरी नगरपरिषद पंप हाऊसमधील जुने गर्डर बदलणे, नवीन चेकर प्लेट तसेच 180 एचपी क्षमतेचे दोन नवीन पंप बसविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने पुढील महिनाभरासाठी राहुरी शहरातील पाणीपुरवठा दिवसाआड होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली.
राहुरी शहर व उपनगरासाठी असलेली ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान’ अंतर्गत सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. 15 मार्चपर्यंत योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी नगर परिषद प्रशासन प्रयत्नशील आहे, असे ठोंबरे यांनी सांगितले.
मुळा धरणातील नगर परिषद जॅकवेल विहिरीवर यापूर्वी 90 तसेच 40 अश्वशक्तीचे दोन मोटरपंप बसविण्यात आले आहेत. शहराची लोकसंख्या 45 हजारांच्या पुढे गेली आहे. शहराचा विस्तार वाढत असताना जुन्या पाणी योजनेवरून पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा विभागप्रमुख भाऊसाहेब ढोकणे, शुभम धाडगे करीत आहेत.
सुधारित पाणी योजनेतून शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होणार असल्याने नगर परिषद प्रशासनाकडून हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी केले आहे.
30 हजार लोकसंख्या अवलंबून 1994 साली कार्यान्वित झालेल्या राहुरी नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेला 30 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. जुलै 2021 मध्ये ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान’ अंतर्गत सुधारित ‘पाणीपुरवठा योजने’चे काम सुरू झाले. 25 कोटी 93 लाख रुपये खर्चाच्या या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. 2054 सालापर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून सुधारित ‘पाणीपुरवठा योजने’चे काम झाले आहे. – ज्ञानेश्वर ठोंबरे, मुख्याधिकारी, राहुरी नगरपरिषद.


























































