राहुरी नगर परिषदेची लिफ्ट बंद पडली: एक तासाने दोघांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

राहुरी नगर परिषदेच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगार व नागरीकाला १ तासाच्या प्रयत्नांनंतर सहीसलामत बाहेर काढल्याने उपस्थितांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.

राहुरी नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यालयात आज शनीवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सकाळी साडेदहा वाजता नगर परिषदेचे कामगार विजय डागवाले यांनी पालिकेत आलेल्या नागरीकास बरोबर घेऊन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट सुरू केली माञ वरच्या मजल्यावर पोहचण्यापूर्वीच विजेचा पुरवठा खंडीत झाल्याने पालिका कर्मचारी डागवाले व संबधीत नागरीक लिफ्टमध्ये अडकले गेले.

डागवाले यांना रक्तदाबाचा ञास असल्याने या घटनेने ते देखील भांबावून गेले. लिफ्टमधून बाहेर कसे पडणार या भितीने लिफ्टमध्ये अडकलेल्या दोघांची चांगलीच गाळण उडाली. नगर परिषदेचे कर्मचारी राजेंद्र जाधव, सुनील कुमावत, राजेंद्र पवार व इतरांनी तासभराचा प्रयत्न करून लिफ्टमध्ये अडकलेल्या दोघांना सहीसलामत बाहेर काढले. लिफ्ट मधुन बाहेर पडताच नगर परिषदेचे कर्मचारी व संबंधित नागरीकाने सुटकेचा सुस्कारा सोडला.

नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वयस्कर तसेच अपंग व्यक्तींची सोय म्हणून १० वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून या लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. माञ लिफ्ट सुरू करण्यास पदाधिकारी व प्रशासनाला गेल्या १० वर्षात मुहूर्त मिळाला नसल्याने लिफ्ट धूळखात पडून होती. तर लिफ्ट बंद असल्याने कामकाजानिमित्ताने नगर परिषदेच्या कार्यालयात येणा-या वयोवृद्ध तसेच अपंगाची हेळसांड सुरू होती.

दोन महिन्यापूर्वी लिफ्ट सुरू झाल्याने वयोवृद्ध तसेच अपंग नागरीकांना दिलासा मिळाला. आज शनीवारी राहुरी नगर परिषदेची लिफ्ट वरच्या मजल्यावर पोहचण्यापूर्वीच बंद पडल्याने हा दिलासा औटघटकेचा ठरला. लिफ्ट सुरू करण्यापूर्वी जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी नगर परिषदेच्या प्रशासनाची असताना याकडे झालेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष आजच्या घटनेला कारणीभूत ठरले आहे. जनरेटरची पर्यायी व्यवस्था नसताना नगर परिषदेची लिफ्ट सुरू झालीच कशी? हा वादाचा मुद्दा ठरला आहे.