रेल्वेला वीज वितरण परवाना मिळाल्याने टाटा, महावितरणला झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) रेल्वेला राज्यात स्वतंत्र वीज वितरण परवाना दिला आहे. याचा रेल्वेला मोठा आर्थिक फायदा होणार असला तरी टाटा पॉवर आणि महावितरण या सरकारी वीज कंपनीला झटका बसणार आहे. महाराष्ट्रात रेल्वेला आवश्यक असलेली वीज आतापर्यंत टाटा आणि महावितरणकडून रेल्वे ग्राहक म्हणून खरेदी करत होती. मात्र आता रेल्वेलाच स्वतंत्र वीज वितरणाचा परवाना मिळाल्याने ते थेट वीजनिर्मिती कंपनीकडून वीज खरेदी करू शकणार आहेत. त्यामुळे दोन्ही कंपन्यांना रेल्वेकडून मिळणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल बंद होणार आहे.

रेल्वे आपल्या विजेवरील गाड्या चालवण्याबरोबरच रेल्वे स्टेशन, कार्यालये आणि यार्डामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. त्यामुळे रेल्वे मुंबईत टाटा पॉवरकडून दिवसाला सुमारे 80 मेगावॅट तर राज्यभर महावितरणकडून 350 मेगावॅट वीज घेत होती. मात्र मागील दोन वर्षांपासून रेल्वेने आरजीपीपीएलच्या विजेला पसंती देत त्यांच्याकडून खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढल्यास किंवा आरजीपीपीएलच्या प्रकल्पात काही बिघाड झाला तरच रेल्वे गरजेनुसार टाटा आणि महावितरणकडून वीज घेत असल्याने त्यांच्या महसुलात आधीच घट झाली आहे. त्यातच आता वीज आयोगाने रेल्वेला स्वतंत्र वीज वितरण परवानाच दिल्याने कोणत्याही बंधनाशिवाय रेल्वे थेट बाजारातून वीज घेऊ शकणार आहे. त्यामुळे भविष्यात या दोन्ही कंपन्यांकडून रेल्वेला एक युनिटही वीज घ्यावी लागणार नाही. याचा सर्वाधिक फटका महावितरणला बसणार असून वर्षाला एक हजार-बाराशे कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. याबाबत महावितरणकडे विचारणा केली असता सध्या रेल्वे आमच्याकडून वीज घेत नसली तरी भविष्यात मागणी वाढताच त्यांना वीज घ्यावी लागली असती. पण त्यांना वीज वितरण परवानाच मिळाल्याने आम्ही मोठा ग्राहक गमावल्याची खंत व्यक्त केली.

सामान्य ग्राहकांवरही भार पडणार
महावितरणच्या विजेचा दर एमईआरसीने सुमारे सहा रुपये निश्चित केला आहे. मात्र रेल्वबरोबरच इतर औद्योगिक ग्राहकांना जादा दराने वीज दिल्यानंतर मिळणारी वाढीव रक्कम क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांकडे वळवली जाते. त्यामुळे त्यांना स्वस्त दरात वीज देणे शक्य होते. पण आता रेल्वेसारखा मोठा ग्राहकच कायमस्वरूपी गेल्याने हजारो कोटींचा महसूल बुडणार आहे. त्यामुळे क्रॉस सबसिडी कमी होऊन भविष्यात सामान्यांवर वाढीव दराचा भार पडणार असल्याचे महावितरणच्या प्रवक्त्याने सांगितले.