ठाण्यात मिंध्यांचे सहन होईना, सांगताही येईना! शिवसेनेच्या राजन विचारे यांची प्रचारात आघाडी

राज्यात भाजपने लोकसभेच्या अनेक जागांवर मिंध्यांची गळचेपी केली असतानाच ठाण्यावरही भाजपने दावा केल्याने मिंधे गटाची गोची झाली आहे. संघप्रणीत थिंक टँकने मुख्यमंत्र्यांना चारही बाजूने घेरले असून राज्याच्या राजकीय वर्तुळात मिंध्यांना ठाण्यात उमेदवार न मिळणे हा चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विद्यमान खासदार राजन विचारे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्यासमोर मिंध्यांना उमेदवार न मिळाल्यामुळे मिंध्यांची अवस्था ‘भाजपने केलेली गळचेपी सहन होईना.. आणि आपल्या उमेदवाराचे नाव सांगताही येईना’ अशी झाली आहे.

पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या विदर्भात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असली तरी संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात मात्र शिवसेनेने प्रचारात जबरदस्त आघाडी घेतली आहे. २०१४ व २०१९ या दोन्ही वेळच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांनी दणदणीत मते मिळवून विरोधकांना धूळ चारली. आता विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी ते पुन्हा आखाड्यात उतरले आहेत. त्यांचा प्रचार जोरात सुरू असून मिंधे मात्र अजूनही उमेदवारच चाचपडत आहेत. गद्दारीची सुरुवात ठाण्यातून करीत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी सूत जुळवून मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात घालून घेतली. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यातील फुले त्यांनाच टोचायला सुरुवात झाली आहे.

असा आहे इतिहास

राजकीयदृष्ट्या ठाणे हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ समजला जातो. पूर्वी येथून भाजपचे रामभाऊ म्हाळगी, प्रा. राम कापसे असे दिग्गज निवडून गेले. त्यावेळी शिवसेना व भाजपची युती होती. मात्र तेव्हाही जागा वाटपाच्या वेळेस ठाणे हेच चर्चेचे प्रमुख केंद्र असायचे. धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्याची जागा भाजपकडून हिसकावून घेतली आणि प्रथमच प्रकाश परांजपे यांच्या रूपाने शिवसेनेला खासदार मिळाला. अनेक वर्षे त्यांनी प्रभावीपणे संसदेत काम केले. फक्त संजीव नाईक यांचा अपवाद वगळता ठाण्यातून सलग शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आहे. निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक हे समीकरण अजूनही कायम असून राजन विचारे यांनी आतापासूनच मिंध्यांना घाम फोडायला सुरुवात केली आहे.

तिघांच्या नावाची फक्त चर्चाच

भाजपला रोखण्यासाठी नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांची नावे पुढे केली आहेत. त्यापैकी सरनाईक यांना ठाण्यातून लोकसभेची जागा लढवण्याची मनापासून इच्छा नाही, पण त्यांना मारून-मुटकून उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्याविरोधात तर भाईंदरमध्ये भाजपच्या कार्यकत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. काही दिवस म्हस्के यांचेही नाव घेतले जात होते. मात्र त्यांना कुणीच जुमानत नाही. रवींद्र फाटक यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असे गृहित धरून भेटीगाठीही सुरू केल्या, परंतु फाटक हे लोकसभेचे ‘मटेरियल’ नाही, अशी चर्चा सुरू आहे.

Lok Sabha Election 2024 – मिंधे गरगरले; ठाण्यात ‘डुप्लिकेट मोदी’ आणले

  • जागा वाटपाची बोलणी सुरू होती तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कल्याण व ठाणे हे दोन्ही मतदारसंघ आमच्याकडेच राहतील असा आग्रह धरला होता, पण प्रत्यक्षात ठाण्यातील भाजपने येथील मतदारसंघावर दावा ठोकला आहे.
  • ठाणे जिल्ह्यात आमची ताकद असून कमळाच्या चिन्हावर ही जागा लढवली जाईल असे उघडपणे भाजपचे स्थानिक नेते बोलत आहेत. त्याशिवाय भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात शतप्रतिशतचा दावा केल्याने मिंध्यांची बोलती बंद झाली आहे.
  • भाजपला ठाण्याची जागा सोडत नसाल तर येथून मैत्रीपूर्ण लढत होईल असे संकेतही काही नेत्यांनी दिल्याने आता करायचे तरी काय, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला आहे.