‘मुलगी पाठव, तर क्रिकेट टीममध्ये घेतो’, राजीव शुक्ला यांच्या सहकाऱ्यावर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
akram-saifi-ipl
विराट कोहली, राजीव शुक्ला यांच्यासोबत सेल्फी घेणार अकरम सैफी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंडियन प्रीमियर लिग म्हणजेच आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांचे कार्यकारी सहकारी मोहम्मद अकरम सैफीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज्य स्तरावरील संघात निवडीसाठी उत्तर प्रदेशचा युवा क्रिकेटपटू राहुल शर्माला मुलीची व्यवस्था कर, अशी मागणी केल्याचा आरोप अकरम सैफी यांच्यावर करण्यात आला आहे. हिंदी वृत्तवाहिनी न्यूज-१ ने बुधवारी हे वृत्त प्रसिद्ध केले होते.

या वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अकरम सैफी यांनी बीसीसीआयच्या एज ग्रूप मॅचमध्ये खेळण्याची संधी हवी असल्यास मुलीची व्यवस्था कर आणि दिल्लीच्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पाठवं, अशी मागणी करतानाची एक कथित ऑडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर केवळ मुलगीच नाही तर पैशांची देखील मागणी केल्याचा आरोप अन्य काही क्रीडापटूंनी केल्याचं देखील वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे.

यूपी क्रिकेट असोशिएशनमध्ये कोणत्याही पदावर काम न करणारे अकरम सैफी हे सर्व सूत्र कसे हलवतात, असा सवालही क्रिकेटपटूंनी केला आहे.

दरम्यान, अकरम सैफी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘क्रिकेटपटू राहुलचा आरोप खरा असता तर त्याने मुलगी पाठवल्यानंतर यूपीच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली असती. पण तसे झालेले नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप खोटे आहेत’, असं अकरम सैफी म्हणाले.