निर्मल गंगेच्या नावाखाली भ्रष्टाचाऱ्यांनी हात धुतले, राजेंद्र सिंह यांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राफेल विमान करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच आता गंगा शुद्धीकरणाच्या नावाखाली पंतप्रधानांनी भ्रष्टाचार वाढवल्याचा आरोप मॅगसेसे पुरस्कार विजेते व जगभरात पाणीतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले राजेद्र सिंह यांनी केला आहे. गंगेच्या नावावर मोदींनी एक मंत्रालय स्थापन केलं आणि आता त्याद्वारे हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला जात आहे असा आरोप सिंह यांनी केला आहे. राजेंद्र सिंह हे गंगा सद्भावना यात्रेसाठी पश्चिम बंगाल आले होते, तिथे त्यांनी हा आरोप केला आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या साडे चार वर्षात गंगा शुद्धीकरणासाठी काहीही केलेले नाही. गंगा शुद्धीकरणाच्या नावाखाली फक्त किनारे स्वच्छ केले जात आहेत. गंगेतील प्रदूषण व आसपासचे अतिक्रमण याकडे दुर्लक्ष केलं जातंय. गंगेच्या पाण्यातील प्रदूषण वाढतच चालले असून ती एक चिंतेची बाब बनत चालली आहे. रक्तात विषाणूचं संक्रमण झालेलं असताना दातावर उपचार करण्यासारखं आहे हे’ असा सणसणीत टोला त्यांनी यावेली मोदी सरकारला लगावला.

गंगेच्या मुद्द्यावरून मोदी सरकार धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ‘पंतप्रधानांनी स्वत:ला गंगेचा पुत्र असल्याचे म्हटले होते. गंगेचा कायापालट करण्याचे वचन दिले होते. आम्हालाही त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी गंगा शुद्धीकरणासाठी काहीही केले नाही. त्याउलट ते गंगेवरून धर्माचे राजकरण करत आहेत. पंतप्रधानांना गंगेला हिंदूंची नदी घोषित करायचे आहे. मात्र गंगा नदी सर्वधर्मियांची आहे. पंतप्रधान नदीवरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे’, असा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी गंगेसाठी केलेल्या कामाचे कौतुक केले. ‘मनमोहन हे बोलत नव्हते पण ते करून दाखवत होते’ अशा शब्दात सिंह यांनी माजी पंतप्रधानांचे कौतुक केले.