
वेड हे कोणत्याही वयामध्ये लागू शकते. त्याला मर्यादा नसतात. याचे उत्तम उदाहरण ठाणे येथील 48 वर्षीय व्यक्ती राजेश खांडेकर. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी राजेश खांडेकर यांनी अमेरिका खंडातील 17 देशांच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तीही सायकलवरून. 336 दिवसांत ते चक्क 17 देशांची भ्रमंती करणार आहेत. अर्जेंटिनापासून सुरू झालेल्या प्रवासाचा शेवट कॅनडा येथे होणार आहे.
या देशांमधून करणार जनजागृती
अर्जेंटिना, कॅनडा, उरूग्वे, ब्राझील, पॅराग्वे, बोलविया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, पनामा, ग्वेटमाला, मेक्सिको, यूएसए, कॅनडा, कोलंबिया, पनामा (काही छोटय़ा देशांमधूनही ते जाणार आहेत.)
1990 मध्ये सुरू झाला प्रवास
उमेश ठाकूर व सविता ठाकूर यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे राजेश खांडेकर यांनी जनजागृतीसाठी सायकल मोहीम हाती घेतली. 1990 सालामध्ये ठाणे ते वज्रेश्वरी असा प्रवास केल्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही.
आशिया, युरोप दौऱयावर यश
खांडेकर यांनी 1997 सालामध्ये सायकलवरून हिंदुस्थानातील बहुतांशी शहरे फिरून पर्यावरण संवर्धन जनजागृती केली. यादरम्यान त्यांनी 13 हजार 800 किलोमीटर सायकल चालवली.
आता लक्ष्य आफ्रिका खंडाचे
फॅब्रिकेशनचा व्यवसाय करीत असलेले राजेश खांडेकर यांना आगामी काळात आता आफ्रिका खंडातील देशांची सायकलवरून स्वारी करावयाची आहे. तसेच त्यांना अंटार्क्टिका, अलास्कालाही जायचे आहे. आई, भाऊ व त्याची पत्नी, मुलगा यांच्यासोबत वास्तव्य करीत असलेले राजेश खांडेकर हे दररोज एक ते दोन तास सायकल चालवून फिटनेसबाबतही जागरूक असतात हे विशेष. फॅब्रिकेशनच्या व्यवसायातून कमवलेल्या रकमेचा उपयोग ते दौऱयावरील होणाऱया खर्चासाठी करतात.

























































