मास्कसक्तीचा निर्णय पुढील पंधरा दिवसांत; राजेश टोपे यांचे सूतोवाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, ठाण्यासह राज्यातल्या सहा जिह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. पण पुढील 15 दिवसांतील रुग्णसंख्या व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून मास्कची सक्ती करायची अथवा नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले.

मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड व पुणे या पाच जिह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना तातडीने पत्र पाठवून उपाययोजना राबविण्यास सांगितले आहे.  सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे नमूद केले आहे.

टास्क फोर्सच्या बैठकीतच निर्णय

यावेळी बोलताना राजेश टोपे पुढे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी राज्याच्या टास्क फोर्सची बैठक झाली. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे त्यासाठी मास्क वापरण्याचे आवाहन करण्याचा निर्णय झाला आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रायगड या सहा जिह्यांसाठी काही वेगळय़ा उपाययोजना कराव्या लागतील असे पत्रात नमूद केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी काही उपाययोजना करण्याचे सुचवले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असलेल्या जिह्यांमध्ये मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. सध्या तरी मास्क सक्तीचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘मस्ट’ शब्दामुळे गोंधळ

राज्याच्या आरोग्य विभागाच्या या परिपत्रकात मास्कच्या वापराबाबत ‘मस्ट’ असा शब्दप्रयोग केला आहे. त्यामुळे गोंधळ उडाला आणि राज्यात पुन्हा मास्कसक्ती करण्यात आल्याची बातमी पसरली. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तातडीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण केले.

मास्क कुठे वापरावा

सार्वजनिक ठिकाणे, बसेस, रेल्वे, शाळा, ऑफिस, रुग्णालयांमध्ये मास्क वापरावे. खुल्या मोकळय़ा जागेत मास्क न वापरण्याला शिथिलता देता येईल, असे टोपे म्हणाले.

राजेश टोपे काय म्हणाले…

राज्याच्या आरोग्य सचिवांनी सर्व महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये इंग्रजीत ‘मस्ट’ शब्द वापरला तरी सक्तीचा बंधनकारक होत नाही.  हे मास्क वापरण्याचे आवाहन आहे, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.