‘2.0’ ने रचला इतिहास, ‘बाहुबली’ आणि ‘ऍव्हेंजर्स’ला मागे टाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

रजनीकांत आणि अक्षयकुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’ हा सुमारे 600 कोटींचा बिग बजेट चित्रपट गुरुवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. फर्स्ट डे फर्स्ट शोपासून चित्रपटाने प्रेक्षकांची गर्दी खेचली आहे. ‘बुक माय शो’वर या चित्रपटाचे दहा लाखांहून अधिक तिकिट बुक झाली आहेत. त्यामुळे ‘2.0’ चित्रपटाने ‘बाहुबली’ आणि ‘ऍव्हेंजर्स’ला मागे टाकले आहे.

‘2.0’ च्या तिकिट विक्रीचा हा आकडा ‘मार्व्हल्स ऍव्हेंजर्स : इन्फिनिटी कॉर’ आणि ‘बाहुबली : द बिगनिंग’ यांच्यापेक्षाही जास्त असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी दिली. आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने पहिल्या दिवशी 50 कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. तर ‘2.0’ पहिल्या दिवशी जगभरात 100 कोटी कमावण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे झाल्यास हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील हा मैलाचा दगड ठरेल. 2.0 हा चित्रपट जगभरातील 10 हजारांहून अधिक स्क्रिन वर तामीळ, हिंदी, इंग्रजी भाषेत झळकला
आहे.

मुंबई, चेन्नईत रजनी उत्सव
चेन्नई, मुंबईत रजनीकांत यांचे बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज, कटआऊट लावण्यात आले. माटुंग्याच्या अरोरा थिएटरबाहेर रजनीचे 68 फूट कटआऊट लावण्यात आले. सायनच्या पीव्हीआरमध्ये सकाळी 6 वाजता विशेष शोचे आयोजन करण्यात आले. त्याआधी पूजाअर्चा, नंतर पारंपरिक नृत्य, 69 फूटाच्या कटआऊटला 40 फूटांचा हार घालण्याचा सोहळा पार पडला. चेन्नईत चाहत्यांनी मनसोक्त डान्स करीत चित्रपटाचा आनंद लुटला. त्यासाठी तीन मिनिटं चित्रपटाचे प्रक्षेपणही थांबवण्यात आले.

पायरसी रोखण्यासाठी 12 हजार वेबसाईट्स ब्लॉक
‘2.0’ ची पायरसी रोखण्यासाठी 12 हजार वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. पायरसी फोफावत असून कोणताही नवा चित्रपट इंटरनेटकर प्रदर्शनापूर्वीच लीक होत आहे. यापूर्वी काला, संजू, कबाली यांसारखे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या आधी किंवा प्रदर्शनाच्या दिवशीच इंटरनेटवर लीक झाले होते. ‘2.0’च्या बाबतीत असं घडू नये यासाठी जवळपास 12 हजार वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत.