
सामना ऑनलाईन । चेन्नई
‘जवाहरलाल नेहरू व राजीव गांधी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशातील प्रभावशाली नेते आहेत’, अशा शब्दात प्रसिद्ध अभिनेते व रजनी मक्कल मंदरम या पक्षाचे अध्यक्ष रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. रजनीकांत यांनी मोदींच्या 30 मे रोजी होणाऱ्या शपथविधीचे आमंत्रण देखील स्वीकारले आहे.
‘लोकसभा निवडणूकीतील हा विजय नरेंद्र मोदी या व्यक्तीचा आहे. ते एक प्रभावशाली नेते आहेत. हिंदुस्थानात जवाहरलाल नेहरू व राजीव गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदीच हे प्रभावशाली नेते आहेत. मी त्यांच्या शपथविधीला जाणार आहे’, असे रजनीकांत यांनी सांगितले.
यावेळी रजनीकांत यांनी राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये असे मत देखील मांडले आहे. ‘राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असे मला वाटते. त्यांनी स्वत:ला सिद्ध करावे. लोकशाहीत विरोधक देखील ताकदीचा असावा लागतो, अशी प्रतिक्रीया रजनीकांत यांनी दिली आहे.

























































