
शाळेसाठी नवीन गणवेश हवा म्हणून बरेच दिवस आईच्या मागे लागलेल्या एका 15 वर्षाच्या मुलाने आईच्या वाढदिवशीच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील बहरोड गावात ही घटना घडली आहे.
राजू( नाव बदलले आहे) हा त्याच्या आईसोबत गावात एका भाड्याच्या खोलीत राहायचा. राजूच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्याची आई एका शाळेत शिक्षिका होती. गेल्या काही दिवसांपासून राजूने आईकडे नवीन गणवेश घेऊन देण्यासाटी तगादा लावला होता. मात्र त्याची आई हो हो म्हणून टाळत होती.
शुक्रवारी राजूने पुन्हा एकदा आईकडे नवीन गणवेश देण्याची मागणी केली. त्यावेळी त्याच्या आईने त्याला ओरडत बाजूला केले व त्या कामाला निघून गेल्या. मात्र येताना संध्याकाळी गणवेश घेऊन येईन असे त्यांनी सांगितले होते. मात्र राजूने कसलाही विचार न करता थेट सुसाईड नोट लिहून गळफास घेतला. त्या सुसाईड नोटमध्ये त्याने लिहले आहे की ”आई, आता तुला कामाला जायला कधीच उशीर होणार नाही. जगातलं सर्वात सुंदर गिफ्ट मी तुला दिलं आहे. हॅप्पी बर्थडे मम्मी’,
संध्याकाळी जेव्हा राजूची आई घऱी आली तिने दरवाजा ठोठावला. मात्र राजू दरवाजा उघडत नसल्याने तिने शेजारच्यांना बोलावून दरवाजा तोडून घेतला. दरवाजा तोडल्यानंतर आत जे दिसलं ते धक्कादायक होतं. राजूचा मृतदेह पाहून त्याची आई बेशुद्ध झाली. पोलिसांनी राजूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस नातेवाईकांची चौकशी करत आहेत.



























































