
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शुक्रवारी भाजपच्या गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी टिकैत यांच्या गाडीवर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या तसेच त्यांच्या अंगावर शाईसुद्धा फेकली. राजस्थानातील अलवार परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी चौघा गुंडांना ताब्यात घेतले आहे.
कृषी कायद्यांविरोधात टिकैत हे गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या विविध भागांत किसान महापंचायत घेताहेत. शुक्रवारी ते राजस्थानमध्ये होते. त्यांनी अलवार जिल्ह्यातील हरर्सोरा येथे शेतकऱयांची सभा घेतली. त्यानंतर ते बानसूरच्या दिशेने चालले होते. याचदरम्यान भाजपच्या गुंडांनी त्यांच्या गाडय़ांच्या ताफ्यावर दगडफेक सुरू केली. यात टिकैत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. गुंडांनी टिकैत यांच्या अंगावर शाई फेकली. यावेळी पोलिसांनी हल्लेखोरांना रोखल्यामुळे टिकैत यांच्या जीविताला असलेला धोका टळला. पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवून टिकैत यांना सुरक्षितरीत्या बानसूरला पोहोचवले. मात्र या हल्ल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
भाजपवर चौफेर टीकेची झोड
भाजपवर विविध शेतकरी संघटनांसह देशभरातून चौफेर टीकेची झोड उठली आहे. कृषी कायद्यांना होत असलेल्या तीव्र विरोधामुळेच भाजपच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कृषी कायद्यांवरून देशभर केंद्र सरकारविरोधात पुन्हा संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीत शेतकऱयांचा रास्ता रोको
टिकैत यांच्यावरील हल्ल्याचा दिल्लीतील आंदोलक शेतकऱयांनी तीव्र निषेध केला. घटनेच्या निषेधार्थ शेतकऱयांनी गाझियाबादच्या गाझीपूर सीमेवर ठिय्या आंदोलन करीत दिल्लीतून येणाऱया गाडय़ांची वाहतूक रोखली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर रास्ता रोको करण्यात आला. हल्ल्याचे दिल्लीसह विविध भागांत पडसाद उमटले.
ही लोकशाहीची हत्या – टिकैत
हा हल्ला म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. गुंडांनी गाडीच्या काचा पह्डल्या. भाजपच्या एका आमदाराने या गुंडांना पाठवले होते. गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारझोड केली. आमचे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा टिकैत यांनी दिला आहे.

























































