
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी या पदासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नजम सेठी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.
पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका गमावली होती. त्यानंतर रमीझ राजा यांचं अध्यक्षपद धोक्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत. इंग्लंड मालिकेदरम्यानच माजी बोर्ड सदस्यांच्या नेतृत्वाखालील गटाने रमीझ यांना पीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मोहीम सुरू केली होती. पडद्यामागे काही खेळ खेळला जात असल्याचा दावा या गटाने केला. पीसीबीमधील बदलांसाठी देशाच्या कायदा मंत्रालयाने बोर्डाचे संरक्षक पंतप्रधान यांचीही भेट घेतली होती.
2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाने बहुमत मिळविले तेव्हा नजम सेठी यांनी पीसीबी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पीसीबी बोर्डाच्या घटनेनुसार, अध्यक्षपदासाठी उमेदवारांची नियुक्ती पंतप्रधान करतात. यानंतर, ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’ त्यांच्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करते. रमीझ राजा यांना 2011 मध्ये पीसीबीचे अध्यक्ष बनवण्यात आले.
इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ देशाचे पंतप्रधान झाल्यावर रमीझ राजा यांची खुर्ची जाऊ शकते, असं मानलं जात होतं. तरीही रमीझ यांनी बराच काळ अध्यक्षपदावर टिकाव धरला होता. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघाची खराब कामगिरी आणि अनेक आरोपांनंतर त्याला हटवण्यात आले.

























































