
देशभरात सध्या दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत आहे. मात्र या अशातच एक भयंकर बातमी समोर आली आहे. दिवाळीनिमित्त एका बस चालकाने व कंडक्टरने बसच्या दारात दिवे लावले व ते झोपले. पण त्यांची ही दिवाळी साजरी करण्याची पद्धत त्यांच्याच जीवाशी आली. दिव्यांमळे त्यांच्या बसने पेट घेतला व त्या आगीत होरपळून त्या दोघांचा मृत्यू झाला. झारखंडची राजधानी रांजीमध्ये हा प्रकार घडला आहे.
सदर बस ही खादगडा बस स्टँड वर रात्री थांबणार होती. रात्री झोपायच्या आधी ड्रायव्हर व कंडक्टरने बसमध्येच लक्ष्मी मातेची पूजा केली व दिवे पेटवले. त्यानंतर ते दोघे मागच्या सीटवर झोपायला निघून गेले. मात्र त्या दिव्यामुळे बसने पेट घेतला व त्यानंतर काही मिनिटातच पूर्ण बसमध्ये आगीच्या ज्वाळा उठू लागल्या. ड्रायव्हर व कंडक्टरला जाग आली. तोपर्यंत संपूर्ण बसने पेट घेतलेला होता. त्यामुळे त्यांना बसमधून बाहेर पडता आले नाही व बसच्या आतच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. स्थानिकांनी अग्निशमन दलाला बोलावले. मात्र आग विझवेपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.

























































