Ranji Trophy बंगालच्या क्रीडामंत्र्यांची धमाल; ‘टीम’वर्कमुळे 129 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणजी ट्रॉफीमधील (Ranji Trophy 2021-22) क्वार्टर फायनलचे सामने सध्या सुरू आहेत. बंगळुरुतील जेसीएजी मैदानावर पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये सामना रंगला होता. हा सामना अनिर्णित राहिला असला तरी बंगालच्या खेळाडूंचा सांघिक खेळ आणि क्रीडा मंत्र्यांच्या जबरदस्त कामगिरीसाठी लक्षात राहील.

पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी (West Bengal Sports Minister Manoj Tiwary) यांनी झारखंडविरुद्ध झालेल्या क्वार्टर फायनल लढतीमध्ये दमदार खेळ केला. तिवारी यांनी पहिल्या डावामध्ये अर्धशतक (73 धावा) तर दुसऱ्या डावामध्ये शतक (136) ठोकले. मनोज तिवारीचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे 28 वे शतक होते. हे शतक ठोकल्यानंतर तिवारीने शिखर धवनप्रमाणे मांडीवर थाप देऊन सेलिब्रेशनही केले. विशेष म्हणजे मंत्रीपद मिळाल्यानंतर तिवारीचे हे पहिलेच शतक आहे.

सामना अनिर्णित

पहिल्या डावामध्ये 7 बाद 773 धावांचा डोंगर उभारणाऱ्या पश्चिम बंगालने दुसऱ्या डावात 7 बाद 318 धावा केल्या. तत्पूर्वी झारखंडचा पहिला डाव 298 धावांमध्ये गारद झाला. बंगालकडून मोंदलने चार आणि शाहबाज अहमदने चार बळी घेतले, तर आकाश दीपने एक बळी मिळवला.

INDvsSA T20 दुर्दैवी ऋषभ पंत, विराट कोहलीच्या ‘नकोश्या’ विक्रमाची केली बरोबरी

129 वर्षांचा विक्रम मोडला

या लढतीत पश्चिम बंगालच्या टीमने 129 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. पहिल्या डावामध्ये बंगालने 773 धावांचा डोंगर उभारला होता. बंगालच्या दोन खेळाडूंनी शतकी तर सात खेळाडूंनी अर्धशतकीय खेळी केली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्या नऊ खेळाडूंनी 50 हून अधिक धावांची खेळी करण्याची पहिलीच वेळ आहे. याआधी 1893 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता तेव्हा पहिल्या 8 फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या होत्या.

बंगालकडून 50 हून अधिक धावा करणारे खेळाडू

1. अभिषेक रमन – 61 रन
2. अभिमन्यु ईश्वरन – 65 रन
3. सुदीप कुमार घरामी – 186 रन
4. ए. मजूमदार – 117 रन
5. मनोज तिवारी – 73 रन
6. अभिषेक पोरेल – 68 रन
7. शहबाज अहमद – 78 रन
8. सायन मंडल – 53* रन
9. आकाश दीप – 53* रन