INDvsSA T20 दुर्दैवी ऋषभ पंत, विराट कोहलीच्या ‘नकोश्या’ विक्रमाची केली बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगलेला पहिला टी-20 सामना पाहुण्यात दक्षिण आफ्रिकेने जिंकला. हिंदुस्थानने विजयीसाठी दिलेले 212 धावांचे आव्हान आफ्रिकने 5 चेंडू बाकी असतानाच गाठले. या पराभवामुळे हिंदुस्थानीच सलग 13 टी-20 सामने जिंकण्याचा विक्रम करण्याची संधी मात्र हुकली. याच लढतीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत याच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे.

आयपीएलचा थकवा घालवण्यासाठी टीम इंडियाने विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून आराम दिला. रोहित शर्माच्या जागी केएल राहुलकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. मात्र टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच राहुलला दुखापत झाली आणि तो स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. त्याच्या जागी पंतकडे टीम इंडियाचे नेतृत्व देण्यात आले.

कर्णधार म्हणून ऋषभ पंत याचा हा पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 होता. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे यशस्वी नेतृत्व केलेल्या पंतचा प्रभाव मात्र आंतरराष्ट्रीय पटलावर जाणवला नाही. त्याला पहिल्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झेलावा लागला. कर्णधार म्हणून पहिलाच टी-20 सामना गमावणारा पंत फक्त दुसराच खेळाडू आहे. याआधी हा नकोसा विक्रम विराट कोहली याच्या नावावर जमा झाला होता. आता पंतने या विक्रमाची बरोबरी केली आहे.

विराट कोहली याने कर्णधार म्हणून 2017 मध्ये कानपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. हा सामना टीम इंडियाने 7 विकेट्सने गमावला होता. या विक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कर्णधार म्हणून खेळताना पहिल्या सामन्यातही विराटने 29 धावा केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीतही पंतने 29 धावा केल्या.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 4 बाद 211 धावसंख्या उभारली. सलामीवीर इशान किशन (76) व ऋतुराज गायकवाड (23) यांनी 6.2 षटकांत 57 धावांची खणखणीत सलामी दिली. त्यानंतर श्रेयस अय्यर (36), कर्णधार रिषभ पंत (29) व हार्दिक पांडय़ा (नाबाद 31) या सर्वांनी आक्रमक फलंदाजी केल्याने हिंदुस्थानला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.

पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने 212 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य 19.1 षटकांत केवळ 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. रॅसी वॅनडर डुसेन (नाबाद 75) व डेव्हिड मिलर (नाबाद 64) यांनी चौथ्या विकेटसाठी 131 धावांची अभेद्य भागीदारी करीत दक्षिण आफ्रिकेला सनसनाटी विजय मिळवून दिला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. आता दुसरा सामना 12 जूनला कटकमध्ये खेळला जाईल.