
सामना ऑनलाईन । मुंबई
हृदयातील डाव्या बाजूकडे रक्ताच्या गुठळ्या झाल्याने 61 वर्षीय वत्सला कोळी यांना पॅरेलिसीसचा झटका आला. या त्रासामुळे पक्षाघात किंवा पुन्हा पॅरेलिसीसचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते. हे टाळण्यासाठी जे. जे. रुग्णालयात लेफ्ट ऍट्रायल ऍपेडेज क्लोझर ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली.
सर जे.जे रुग्णालयातील हृदयविकार विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नागेश वाघमारे-पाटील यांनी ही दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पाडली. शुक्रवारी वत्सला यांना जे.जे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना गुरुवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणारे. वत्सला यांना पॅरालेसिसचा (cardioembolic stroke) त्रास होता. त्यांच्या हृदयाच्या डाव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. रक्ताच्या गुठळ्या होऊ नये यासाठी वत्सला यांचं रक्त पातळ करण्यात आलं होतं. मात्र प्रत्येक रूग्णाला रक्त पातळ करण्याच्या प्रक्रियेचा फायदा होतो असं नाही. रक्त पातळ केल्यानंतर वत्सला यांच्या पोटातून रक्तस्राव व्हायला लागला. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर Left atrial appendage या पद्धतीद्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. नागेश वाघमारे यांनी सांगितले. कोलकात्यातील डॉ. पी.के हझरा याशिवाय डॉ. महेश बोडखे, डॉ.विकास मिश्रा, डॉ.शकील शेख, भूलतज्ञ डॉ. सुशिला यादव यांच्यासह नर्स अरूणा सबनीस यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यास मदत केली आहे.
अशी झाली शस्त्रक्रिया
Left atrial appendage या पद्धतीमध्ये हृदयाजवळ प्लग टाकून डाव्या बाजूचा कप्पा बंद करण्यात येतो. वत्सला यांच्यावर उपचार करताना एन्जोग्राफीच्या सहाय्याने पायातून रक्तवाहिनीतून हृदयापर्यंत जाऊन कार्डियाक प्लगच्या सहाय्याने हृदयाच्या डाव्या बाजूला असणारा कप्पा बंद करण्यात आला. स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात येतो.
डॉ. नागेश यांच्या सांगण्यानुसार, या पद्धतीने उपचार करणं फार आव्हानात्मक होतं. जे.जे रूग्णालयात अशा प्रकारची पहिल्यांदाच शस्त्रक्रिया करण्यात आलीये. सरकारी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याने यापुढे गरजू आणि गरीब रूग्णांना याचा फायदा होईल. या पद्धतीनंतर रूग्णाला रक्त पातळ करण्याची प्रक्रिया करावी लागत नाही.
























































