मिंधे सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले येथील लाईट हाऊस जवळ काही व्यापाऱ्यांनी गाण्याचा व्हिडीओ बनवत त्या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला.याघटनेनंतर संतापलेल्या दापोलीतील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तोंडाला काळे पासून चोप दिला.चोप मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी दापोली पोलिसांना माफीनामा लिहून देऊन हातपाय जोडले.
आंजर्ले लाईट हाऊस येथे जाऊन व्यापाऱ्यांनी एका व्हिडीओवर नृत्य केले.त्या व्हिडीओतील गाण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्यात आला होता.छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता.हा व्हिडीओ व्हॉटसॲप स्टेटसवर ठेवण्यात आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दापोलीतील शिवप्रेमी संतापले.
संतापलेले शिवप्रेमी दापोली शहरात जमू लागताच वातावरण तापले.शिवप्रेमींनी व्हिडीओ बनविणाऱ्या व्यापाऱ्यांना दापोली शहरातील केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोलवले.याचठिकाणी संतप्त शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले आणि चोप दिला.
चोप मिळाल्यानंतर माफीनामा
संतापलेल्या शिवप्रेमींनी चोप दिल्यानंतर व्हिडीओ बनविणाऱ्या चेतन जैन,योगेश जैन,महेश सालेचा आणि प्रवीण सालेचा यांनी दापोली पोलिसांना एक माफीनामा लिहून दिला आहे.या माफीनाम्यात अजाणतेपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा उल्लेख झाला असं नमूद करताना क्षमा मागून प्रकरण मिटवण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत.