
रत्नागिरीतील लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाची दुरावस्था झाली आहे. या दुरावस्थेकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले आहे. टिळकांच्या जन्मघराच्या छपराची कौले फुटली आहेत. भिंतीना तडे गेले आहेत. आवारातील पुरातत्व खात्याचा फलक गंजला आहे. मेघडंबरीचीही दुरावस्था झाली असून याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे कोकण समन्वयक मनोज खाड़्ये यांनी पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेत लोकमान्य टिळक स्मारकाच्या दुरावस्थेची छायाचित्रे दाखवत हिंदू जनजागृती समितीने पुरातत्व खात्याच्या कामकाजाविषयी खंत व्यक्त केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे इंग्रजांना ठणकावणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीत झाला. त्यांचे हे जन्मघर पुरातत्व खात्यामार्फत जतन करण्यात आले आहे. सध्या मात्र या जन्मघराची अवस्था बिकट झाली आहे. लोकमान्य टिळकांच्या जन्मघराला तडे गेले आहेत. पुरातत्व खात्याने लोकमान्य टिळकांच्या जन्मघराबाहेर लावलेला फलक गंजला असून तो आता वाचताही येत नाही. मेघडंबरीची दुरावस्था झाली आहे. स्मारकाच्या छपरावरील कौलांवर गवत वाढले असून त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास वास्तूला धोका निर्माण होऊ शकतो. मेघडंबरीच्या मागे लोकमान्य टिळकांची शिल्पाकृती तुटलेल्या स्थितीत आहे.
त्यामुळे सध्या पुरातत्व खात्याने तातडीने या जन्मस्थानाची दुरुस्ती करावी अशी मागणी मनोज खाड़्ये यांनी केली. पुढे ते म्हणाले की, लोकमान्य टिळक स्मारकाला देशभरातून शेकडो पर्यटक भेट देतात. शाळांच्या सहली येतात. मात्र दुर्दैवाने स्मारकाच्या ठिकाणी माहिती देणारी माहितीपुस्तिका नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पाण्याची व्यवस्था नाही. सीसीटिव्ही नाही. वाहनतळ नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचे त्वरीत संरक्षण आणि संवर्धन करावे. तसेच या स्मारकाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करावे आणि त्या स्मारकात लोकमान्य टिळकांची माहिती देणारा लघुपट दाखवण्यात यावा. माहितीपुस्तीका उपलब्ध करावी. तसेच लोकमान्य टिळकांचे ग्रंथ, लोकमान्य टिळकांची दुर्मिळ छायाचित्रे यांचा संग्रह स्मारकात असावा अशी मागणी मनोज खाड़्ये यांनी केली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे संजय जोशी, दीपक जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

























































