
सामना प्रतिनिधी । ठाणे
दो पेटी तयार रख…नही तो उडा दूंगा, अशी धमकी देत व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या रवी पुजारी टोळीच्या पंटरवर आता गांजा विकण्याची वेळ आली आहे. विठ्ठलवाडी येथे तब्बल साडेआठ किलोच्या गांजासह रवी पुजारी टोळीचा हस्तक रोहिदास गाडगे याला ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात हा गांजा नेमका कोणाला विकला जाणार होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
ठाण्यातील व्यावसायिक, बिल्डरांना खंडणीसाठी धमक्या देऊन रवी पुजारी टोळीच्या हस्तकांनी जेरीस आणले होते. मात्र खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने पुजारी टोळीचे कंबरडेच मोडल्याने टोळीच्या हस्तकांवर चक्क गांजा विकण्याची केळ येऊन ठेपली आहे. ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विजय पोवार यांच्या पथकाने कल्याण चिंचपाडा भागात एका झोपडीवर छापा टाकला. यावेळी पुजारी टोळीचा हस्तक रोहिदास गाडगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख 55 हजार रुपये किमतीचा आठ किलो 500 ग्रॅमचा गांजा ताब्यात घेतला. गाडगेविरोधात मुंबई युनिट – 7 येथे चार खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.
























































