मार्च महिन्यात जीएसटीचे विक्रमी संकलन; सरकारची 1.23 लाख कोटींची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे अडचणीत आलेली अर्थव्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहे. सलग सहाव्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीचे कर संकलन वाढत आहे. जीएसटी वसूली 1.23 लाख कोटी रुपयांवर पोहचली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने गुरुवारी याची माहिती दिली आहे. मार्च महिन्यात 1,23,902 कोटी झाल्याचे सांगण्यात आले आहे. जीएसटी करपद्धती सुरू झाल्यानंतर ही आतापर्यंतचे विक्रमी करसंकलन आहे.

कोरोना महामारीनंतर सलग चौथ्यावेळी करसंकलन 1.23 लाख कोटींवर गेले आहे. हे अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे संकेत आहे. मार्च महिन्यात 1.23 लाख कोटी संकलनातील केंद्रीय जीएसटी 22,973 कोटी रुपये, राज्य जीएसटी 29,329 कोटी रुपये आणि एकीकृत जीएसटी 62,842 कोटी रुपये आहे. तर उपकराचे संकलन 8,757 कोटी रुपये झाले आहे. त्यात 935 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवर असलेल्या करातून जमा झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात 1,13,143 कोटी रुपये जीएसटी वसूली झाली होती.

मार्च 2021 मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत जीएसटी संकलन 27 टक्के जास्त आहे. विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत बनावट बिलांवर देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यामुळे जीएसटी संकलन वाढल्याचे मंत्रालयाने सांगितले.