रेमडेसिवीरचा काळाबाजार व साठेबाजी; एनआयए, ईडीमार्फत चौकशी करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱयांची केंद्र सरकारने एनआयए आणि ईडीमार्फत चौकशी करावी, अशी जोरदार मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज केली. महाराष्ट्र सरकार युद्धपातळीवर काम करीत आहे; पण केंद्र सरकार अनेकदा बेजबाबदारपणे वागताना दिसत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

नवी दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱयांमध्ये धाक निर्माण करण्यासाठी त्यांची केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. दुसरी बाब म्हणजे रेमडेसिवीर हे कोरोनावरील रामबाण औषध नाही. पण विशिष्ट कालावधीत हे औषध दिल्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने हे औषध कुठे आणि किती प्रमाणात उपलब्ध आहे, याची स्पष्टोक्ती करून त्याचे गरजेनुसार सर्व राज्यांना पुरेशा प्रमाणात वितरण करावे, असे ते म्हणाले.

कोरोनावरून महाराष्ट्रात खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. गुजरातमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱया ब्रुक फार्मा कंपनीच्या एका संचालकाला रंगेहाथ अटक झाली. त्याच कंपनीच्या अन्य एका संचालकाला मुंबई पोलिसांनी चौकशी करण्यासाठी बोलावले असता भाजपचे दोन्ही विरोधी पक्षनेते आणि अनेक आमदार पोलीस ठाण्यात धावून जातात, पोलीस चौकशीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात, हे चुकीचे असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

भाजपा नेत्यांचे कृत्य मानवताविरोधी

रेमडेसिवीर प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. रेमडेसिवीर औषधांचा साठा करणाऱया पंपनीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करताच भाजपा नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या घटनेचे पडसाद दिल्लीत उमटले आहेत. काँगेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी याची दखल घेऊन भाजपावर टीका करणारे ‘ट्विट’ केले आहे. भाजपासारख्या जबाबदार पक्षातील नेत्यांनी रेमडेसिवीरची साठेबाजी करण्याचे कृत्य मानवतेविरोधी असून तो गुन्हा आहे, अशा शब्दांत ‘ट्विट’ करून भाजपा नेत्यांना सुनावले आहे.

कोरोनावरील उपचारासाठी देशाच्या कानाकोपऱयातून लोक जेव्हा रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत, आपला जीव वाचवण्यासाठी लोक आटोकाट प्रयत्न करत आहेत, अशा प्रसंगी भाजपासारख्या जबाबदार पक्षाच्या नेत्यांनी रेमडेसिवीरची साठेबाजी करण्याचे कृत्य मानवतेच्या विरोधात आहे. तो कायद्याने गुन्हा आहे, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.

भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करा, भाई जगताप यांची मागणी

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला वाचविण्याचा प्रयत्न भाजपचे नेते का करत आहेत? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील इंजेक्शन निर्मिती करणाऱया कंपन्यांकडून इंजेक्शन्सचा साठा प्रथम महाराष्ट्रालाच मिळायला हवा. माझी अशी राज्य सरकारकडे मागणी आहे की, सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी. तसेच 30 एप्रिलला महाराष्ट्रातील लॉकडाऊन संपल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि भाजप पक्षाविरोधात रस्त्यावर उतरून मुंबई काँग्रेसतर्फे आम्ही मोठे आंदोलन करणार आहोत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.