रिझर्व्ह बँकेचा गंभीर इशारा, जीडीपी 5 टक्क्यांवर; महागाईचा भडका आणखी उडणार

405

अर्थव्यवस्थेत होत असलेल्या घसरणीबद्दल रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात चिंता व्यक्त केली आहे. मंदीमुळे 2019-20 या आर्थिक वर्षात जीडीपी 5 टक्क्यांपर्यंत खाली असेल असा अंदाज व्यक्त करतानाच महागाईचा भडका आणखी उडणार असल्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने रेपोरेटमध्ये कोणतीही कपात केली नाही. रेपोरेट 5.15 टक्के जैसे थे ठेवला आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळालेला नाही.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वीच्या पतधोरणांमध्ये सलग पाच वेळा रेपोरेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात केली होती, मात्र आजच्या पतधोरणात रेपोरेटमध्ये कोणताही बदल केला नाही. रेपोरेट 5.15 टक्के आणि रिव्हर्स रेपोरेट 4.90 टक्के जैसे थे ठेवला आहे. रेपोरेट दरात कपात करण्याचा निर्णय सध्या ‘पॉज’मध्ये ठेवला आहे असे दास म्हणाले.

– देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या पतधोरणात चिंता व्यक्त केली.
– 2019-20 या आर्थिक वर्षात सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) 6.1 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला होता. आता जीडीपी 5 टक्केच असेल असा अंदाज रिझर्व्ह बँकेने वर्तविला आहे.
– महागाई वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर 4.6 टक्के होता. आता आर्थिक वर्षे संपेपर्यंत हा दर 4.7 ते 5.1 टक्क्यांपर्यंत भडकण्याची शक्यता.
– कांद्याचे दर मोठय़ा प्रमाणावर वाढले. टोमॅटो आणि इतर भाजीपाल्यांच्या दरांमध्येही तेजी आहे असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या