
>>श्रीकांत आंब्रे
दलित पँथरची चळवळ ही एका विद्रोहातून जन्माला आली. आज ती पन्नाशीच्या उंबरठय़ावर असली तरी त्याही अगोदर दलित साहित्यातून उमटलेल्या अन्यायाच्या वेदनेचा तो आविष्कार होता. म्हणूनच या दोन्ही घटकांचे नाते अतुट होते. दलित साहित्य चळवळीचा तो कृतिशील आणि प्रखर आवाज होता. आक्रमक आणि जहाल भाषेत हा दलित तरुण त्याला वाटणाऱया रिपब्लिकन गटबाज नेतृत्वाविरुद्ध, प्रस्थापित हिंदू समाजाने लादलेल्या अस्पृश्यतेविरुद्ध आणि राज्यकर्त्यांविरुद्ध टीकेचा भडिमार करू लागला. दलित तरुणाला आणि समाजाला दलित पँथरने एक दिलासा दिला, परंतु दोन-तीन वर्षांत या संघटनेतही फूट पडली. ती अपरिहार्य होती. पँथर एक शक्ती म्हणून जास्त दिवस टिकली नसली तरी एकूण मरगळलेल्या दलित तरुणांच्या ठायी असलेली सामाजिक जाणिवेची ज्योत ‘दलित पँथर’ने प्रज्वलित केली आणि आंबेडकरी चळवळीतल्या तिसऱ्या पिढीच्या नेतृत्वाच्या आगमनाची चाहूल वर्तवली. ‘दलित साहित्य’ आणि ‘दलित पँथर’ या दोन्ही चळवळींचे ऊर्जापेंद्र म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक पुनर्रचनेचा विचार आणि त्यासाठी त्यांनी केलेला अथक संघर्ष हे होते. या दोन्ही चळवळींचे सक्रिय साक्षीदार प्रसिद्ध दलित साहित्यिक, कवी, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते अर्जुन डांगळे होते. ‘दलित साहित्य’ चळवळीवर त्यांनी आजपर्यंत खूप लिहिले आहे आणि आजही लिहीत आहेत.
अलीकडेच त्यांचा दलित पँथर चळवळीच्या संदर्भात ‘दलित पँथर:अधोरेखित सत्य’ हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. या ग्रंथात त्यांनी ‘दलित पँथर’च्या पहिल्या पर्वाचा सम्यक दृष्टीतून समग्र असा वस्तुनिष्ठ कालपट उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या दृष्टीने ‘दलित पँथर चळवळ’ ही एक मूल्यगर्भ घेऊन देशाच्या सामाजिक जीवनात घडलेली एक ठळक आणि लक्षणीय घटना होती. ही चळवळ अल्पजीवी असली तरी तिच्यात परिवर्तनवादी ऊर्जा ठासून भरलेली होती व तिचे प्रत्यंतर आजही येतं, असं त्यांना वाटतं. अशा चळवळीबद्दल यापूर्वी काही लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांतून सत्याशी आणि तत्त्वांशी छेडछाड, हितसंबंध जपताना विचारांशी छेडछाड, सत्याचा अपलाप, अर्धसत्य विचार, एकांगीपणा अंगीकारल्यासारखे दोष त्यांना दिसतात. काही त्रुटीही जाणवतात. हे कोणी मुद्दाम केले असेल असे त्यांना वाटत नाही. हा सर्वंकष विचार करून या चळवळीशी संबंध असलेला एक लेखक, कार्यकर्ता म्हणून या चळवळीचा वस्तुनिष्ठ आलेख नव्या पिढीसमोर मांडावा हा उद्देशही या लेखनामागे असून ते आपले कर्तव्य असल्याचे ते मानतात.
या पुस्तकात ‘दलित पँथर’पूर्व सामाजिक वातावरण, ‘दलित पँथर’ची संस्थापक मंडळी, पँथरमधील मतभेद, अन्य पक्ष आणि पँथर, रिपब्लिकन पक्ष आणि पँथर, दलित साहित्य चळवळ आणि पँथर… अशा काही ठळक मुद्दय़ांचे विवेचन अर्जुन डांगळे यांनी केले आहे. ते करताना दलित पँथरचे संस्थापक व चळवळीतील सहकाऱ्यांनी लिहिलेल्या चळवळीच्या इतिहासाचा आधार त्यांनी घेतला आहे. चळवळीतील भाष्यकारांच्या विश्लेषणात जे दोष आढळले ते ते दूर करून भावी पिढीसमोर इतिहासाचा लख्ख वस्तुनिष्ठ पट ठेवणे हे चळवळीचा साक्षीदार म्हणून आपले कर्तव्य असल्याच्या भावनेतून त्यांनी हे लिखाण केले आहे. चळवळीतील सहकाऱ्यांतील गुणांचे, कर्तृत्वाचे कौतुक करत असताना आणि लिखाणातील दोष दाखवताना आंबेडकरी जाणिवेतून व कर्तव्यनिष्ठेतून हे लेखन केल्याचे जाणवते.
या चळवळीचा आढावा घेताना ‘बतावणी’त चळवळीची पार्श्वभूमी, दलित साहित्याचा आढावा, दलित पँथरच्या स्थापनेपूर्वीची परिस्थिती, 1967 च्या सुमारास चळवळीच्या दिशेने पाऊल, 1967-70च्या दरम्यानच्या परिवर्तनवादी साहित्याचा लेखाजोखा, सत्तरच्या आसपासची अस्वस्थता, युवक आघाडीची सिद्धार्थ विहार वसतिगृहात झालेली स्थापना, युवक आघाडीचा घटनाक्रम आणि वाटचाल, ‘साधना’ प्रकरणावरून महाराष्ट्रात उठलेले वैचारिक वादळ, तत्कालीन सामाजिक, साहित्यिक ठळक घटनांची नोंद, ‘दलित पँथर’चा चढता आलेख, ‘दलित पँथर’ची स्थापना, वरळीची दंगल ः पोटनिवडणूक आणि ‘दलित पँथर’, ‘दलित पँथर’मधील फूट-फाटाफूट, ‘दलित पँथर’ची बरखास्ती! ‘सत्य आणि तथ्यांशी केलेल्या छेडछाडीचा आणि कपोलकल्पित घटनांचा पंचनामा, तळापासून चळवळीचा तळ ढवळताना काढलेले निष्कर्ष असे या ग्रंथाच्या प्रकरणांचे स्वरूप आहे. सोबत ‘दलित पँथर’ चळवळीतील नेत्यांची, प्रमुख कार्यकर्त्यांची, आंदोलनात शहीद झालेल्या ‘पँथर्स’ची, संघटनेच्या चळवळींची कृष्णधवल छायाचित्रे आहेत.
आजपर्यंत दलित चळवळीतल्या बहुतांश नेत्यांनी ‘दलित पँथर’ चळवळीच्या उदयाचे आणि ऱ्हासाचे आपापल्या दृष्टिकोनातून मूल्यमापन केले आहे. त्यात एकमेकांच्या गुणगौरवाबरोबर दोषांवरही आगपाखड करण्यात आली आहे. या भांडणांमध्ये दलित जनतेचे अतोनात नुकसान होऊन चळवळीचा भक्कम आधार तुटला असला तरी या क्रांतिकारी ऊर्जा देणाऱया दलित तरुणांचे वेगवेगळे गट पँथरच्या रूपात दलितोद्धाराचे कार्य नेटाने चालवत आहेत. हा ग्रंथ डांगळे यांनी आपल्याला वाटणाऱया भूमिकेशी इमान राखून लिहिलेला असला तरी त्या विचारमंथनातून नक्कीच चांगले काही निर्माण झाले तर दलित पँथर चळवळीचे नक्कीच पुनरुत्थान होईल.
दलित पँथर : अधोरेखित सत्य
लेखक : अर्जुन डांगळे
प्रकाशक : लोकवाङ्मयगृह, मुंबई
पृष्ठ : 401, मूल्य : रुपये 600/-





























































