विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रिक्षाचालकाला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मैत्रीणीसोबत शाळेत जाणाऱ्या सातवीतील विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रिक्षाचालक जितेंद्र दिलीप गावंडे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एच.पाटोदकर यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. संभाजीनगर तालुक्यात राहणारी 14 वर्षांची अल्पवयीन विद्यार्थिनी मैत्रिणीसोबत 24 जून 2013 रोजी चित्तेपिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जात होती. त्या दोघी रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालक जितेंद्रने रिक्षा सुरू केली.

रिक्षा काही अंतरावर गेल्यावर जितेंद्रने एका विद्यार्थिनीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्यावर त्याने अश्लील वर्तन केले. ती जोरात ओरडल्याने घाबरून त्याने रिक्षातून पळ काढला, असे विद्यार्थिनीने तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलीस ठाण्यात जितेंद्र विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्याची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एच.पटोदकर यांच्यासमोर सुनावणी झाली. रिक्षाचालक जितेंद्र याला पोक्सो कायद्याखाली दोषी ठरवून न्यायाधीशांनी त्याला तीन वर्षे सक्तमजुरी एक हजार दंड ठोठावला.