
अकोला दंगलीच्या वणव्यात धुमसत असतानाच नगर जिह्यातील शेवगाव पेटले आहे. रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवेळी दंगल उसळली. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली आणि अनेक गाडय़ा तसेच दुकाने पह्डण्यात आली. या हिंसाचारात दोन पोलिसांसह चारजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी 112 जणांवर गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 31 दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अकोल्यापाठोपाठ शेवगावमध्येही दंगल उसळल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महाराष्ट्रात दंगली कोण घडवत आहे, असा सवाल विचारला जात आहे.
शेवगाव शहरात रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक मिरी रोडमार्गे शेवगाव शहरातील मुख्य एसटी स्टँड चौकात आली. तिथून मिरवणुक पुढे जात असताना डीजेवरून दोन गटांत राडा झाला. रात्री आठच्या सुमारास एकाने दगड भिरकावला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱया गटानेही दगडफेक सुरू केली. यानंतर तुफान दगडफेक झाली. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला पथकासह रात्रीच शेवगावात दाखल झाले होते. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून पोलिसांना सूचना दिल्या.
दंगलप्रकरणी पोलीस कर्मचारी महेश सावंत यांनी फिर्याद दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. 112 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 31 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील 2 जण अल्पवयीन असल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
अकोल्यात जमावबंदी कायम
अकोला शहरामध्ये दंगलीनंतर तणावपूर्ण शांतता आहे. शहरात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. संचारबंदी आज शिथिल करण्यात आली तर जमावबंदी कायम आहे.
शहरात तणावपूर्ण शांतता
मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीनंतर शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस महानिरीक्षक बी. जी शेखर, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी परिस्थितीची पाहणी करुन आढावा घेतला. तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, अजित पाटील हे शेवगावात तळ ठोकून आहेत.
दंगेखोरांना अद्दल घडविणार -देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील त्यांना अद्दल घडवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करा – मुख्यमंत्री
अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणायांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस महासंचालकांना दिले. सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. अकोला आणि शेवगाव येथे परिस्थिती आता नियंत्रणात आहे, असे ते म्हणाले.
रस्त्यावर दगड, विटांचा खच
रविवारी रात्री दोन गटातील हाणामारीच्या घटनेनंतर पुन्हा उशिरा जमावाने शहरातील विविध दुकानांवर व फलकांवर दगडफेक केली. त्यामुळे रस्त्यावर दगड, विटा व फरशांचा सडा पडला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 112 आरोपी निष्पन्न केले असून, गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 31 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील 2 जण अल्पवयीन असल्याने त्यांना सोडून देण्यात आले. उर्वरित 29 जणांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
कडकडीत बंद
दगडफेक सुरू असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यात चारजण गंभीर जखमी झाले. यामध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आज शेवगाव शहरात बंद पाळण्यात आला.

























































