
सामना प्रतिनिधी, मुंबई
झटपट मालामाल होण्यासाठी लोअर परळ येथे सोन्या-चांदीचे व हिऱयांचे दागिन्यांचे पार्सल जमा करण्याचे काम करणाऱया इसमाला लुटून चौघे पसार झाले होते. आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून त्यांनी मागे कोणताही दुवा ठेवला नव्हता. मात्र तरीही गुन्हे शाखेच्या युनिट-3ने कसून तपास करीत त्या चौघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. तसेच आरोपींकडून चोरीचा जवळपास सर्व ऐवज हस्तगत केला आहे.
जयेश (नाव बदललेले) हा काळबादेवी येथे सोन्या-चांदीचे दागिने जमा करून ते परराज्यात तसेच परदेशात पाठविण्याऱया कुरीयर कंपनीत काम करतो. 27 ऑक्टोबरच्या सायंकाळी जयेशने सहा ठिकाणांहून दागिन्यांचे पार्सल ताब्यात घेतले. सातव्या ठिकाणी तो दागिन्यांचे पार्सल घेण्यासाठी जाणार तेवढय़ात चार जणांनी जयेशला लोअर परळच्या मथुरादास मिल कंपाऊंडच्या गेटवर त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तसेच डाव्या हातावर वार करून दागिन्यांची बॅग हिसकावून पळ काढला होता. त्या बॅगेत एक कोटी 33 लाख किमतीचे हिरे व सोन्या-चांदीचे दागिने होते.
याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निपुंबे, उपनिरीक्षक गजानन भारती, मोहसिन पठाण, राजेंद्र बागल, तसेच अविनाश वळवी, रमेश गावीत, मोहिते आदींच्या पथकाने गुह्याचा स्वतंत्र तपास सुरू केला. अखेर कोणताही क्लू नसताना पथकाने सुरेश डोके, महेंदर चौधरी, सतीश सानप, विलास पवार ऊर्फ मामा या चौघांना अटक केली. आरोपींकडून एक कोटी 15 लाखांचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याचे उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.
10 दिवस वॉच ठेवला
आरोपी सुरेश डोके हा घोडपदेव येथील एका कुरीयर कंपनीत हॉलमार्पच्या दागिन्यांची डिलिव्हरी घेऊन ते आणून देण्याचे काम करीत होता. त्यामुळे जयेश हा कुठून व किती दागिन्यांची डिलिव्हरी रोज घेतो याची डोकेला माहिती होती. झटपट पैसा कमाविण्याच्या लालसेपोटी त्याने अन्य तिघांना हाताशी घेऊन जयेशला लुटण्याचा प्लान तयार केला. त्यानुसार आरोपींनी तब्बल 10 दिवस जयेशवर बारीक वॉच ठेवला. मग 27 तारखेला संधी साधून आरोपींनी आपले काम फत्ते केले होते.
दागिने विकण्याआधीच पोलिसांची झडप
विलास पवार हा डोकेचा ओळखीचा. त्यामुळे डोकेने लुटमारीचा प्लान पवारला सांगितला. मग पवारने त्याच्या ओळखीचे चौधरी आणि सानप यांना हाताशी घेऊन जयेशला शिताफीने लुटले. लुटलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने चौघांनी आपल्याला काढून घेतले. ते वितळवून त्यांनी विकले. पण सवा कोटीचे दागिने डोकेने त्याच्या भायखळा येथील घरात लपवून ठेवले होते. दागिने कसे आणि कुठे विकायचे याची जुळवाजुळव सुरू असतानाच पोलिसांनी त्याच्या घरावर झडप मारून दागिने ताब्यात घेतल्याचे सावंत म्हणाले.
summary- robbers got arrested in lower parel




























































