
चारचाकीची काच फोडून तसेच दुचाकीची डिकीतून रोकड लंपास करून फरारी असणाऱ्या आंतरराज्य टोळीचा भांडाफोड करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. कुपवाड येथील हनुमाननगरमधून एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सहा लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या टोळीतील अन्य गुन्हेगारांच्या शोधार्थ पोलिसांनी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
मधु भास्कर जाला (वय 35, रा. कपरालतिप्पा, जि. नेल्लोर, राज्य आंध्र प्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्रात सहा ठिकाणी तर गुजरात, राजकोट या ठिकाणी चार गुन्हे दाखल आहेत. गोपालदास हिरालाल मुंदडा (रा. विश्रामबाग, सांगली) यांनी फिर्याद दिली होती.
सांगली शहरातील पुष्पराज चौकातील एका कोल्ड्रिंक सेंटर समोरून गोपालदास मुंदडा यांच्या दुचाकीच्या डिकीतील 2 लाख 95 हजारांची रोकड लंपास करण्यात आली होती. याबाबत 20 एप्रिल रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वी शहर परिसरासह जिल्ह्यातील आष्टा, कवठेमहांकाळ येथेही वाहनांतून रोकड लंपास करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली आणि अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची बैठक घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी याकरिता स्वतंत्र पथके निर्माण करून शहरात गस्त वाढविली होती. दरम्यान, या प्रकारच्या गुन्ह्यात आंतरराज्य टोळीतील गुन्हेगार सहभागी असून, त्यापैकी एकजण कुपवाड येथील हनुमाननगर येथील गजानन पाटील यांच्या खोलीत भाड्याने राहत असल्याची माहिती पोलीस हवालदार सागर लवटे आणि अनिल कोळेकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने खोलीवर छापा टाकून मधु जाला याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सांगली आणि कोल्हापूर येथील सहा ठिकाणांहून वाहनांमधून रोकड लंपास केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्या खोलीतील एका सॅकमधून सहा लाख रुपये जप्त केले. ही रक्कम त्याला टोळीतील सदस्यांच्या वाटणीतून मिळाली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यावेळी संशयित मधु जालाकडून चार नंबरप्लेट, डिकी उघडण्यासाठी व टायर पंक्चर करण्यासाठी वापरण्यात येणारे मारतुल, चारचाकीची काच फोडण्यासाठी गलोर आणि लोखंडी बॉल बेअरिंग तसेच दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अधिकाऱ्यांसह सागर लवटे, अनिल कोळेकर, संदीप गुरव, बिरोबा नरळे, जितेंद्र जाधव, संदीप नलवडे, विक्रम खोत, संतोष गळवे आदी कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

























































