रोबो शेफची अनोखी दुनिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>स्पायडरमॅन

जगभरात अनेक क्षेत्रात मशीन्सची संख्या वाढते आहे आणि मानवी श्रमांची गरज कमी होत चालली आहे. अर्थातच नवे नवे गॅझेट्स आणि रोबोट्स यांच्यामुळे मानवी नोकऱ्या संकटात पडत चाललेल्या आहेत. कुकिंग अर्थात स्वयंपाकासारख्या क्षेत्रातदेखील आता या रोबोट्सनी प्रवेश केला असून, आपल्या कामाने चांगलीच छाप पाडली आहे. चायना-जपानसारखे देश तर विस्मृतीत चाललेल्या अनेक पाककृतींना या रोबोंच्या मदतीने पुनर्जीवन देत आहेत. हवी ती रेसिपी, हव्या त्या प्रमाणात बनवून देणे ही या रोबोंची खासियत आहे. मीठ, तिखट, मसाले सगळे कसे जागच्या जागी आणि नेमक्या प्रमाणातच पडणार, काही रोबो थर्मल सेन्सर्सवरती चालत असल्याने, भाज्या किंवा मांसदेखील अगदी योग्य प्रमाणातच शिजणार. रोबोट्सच्या मदतीने बनवल्या जाणाऱ्या या व्यंजनांना आणि अशा रेस्टॉरंट्सना लोकांचादेखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आणि दर्जेदार उत्पादन आणि उत्पादन खर्चदेखील कमी यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक या शेफ रोबोट्सना प्राधान्य द्यायला लागले आहेत. कॅलिफोर्नियातील जिम्मे पिझ्झा हा तर याचे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. व्हॅनमध्येच किचन असलेल्या या जिम्मे पिझ्झाच्या किचनमध्ये विविध प्रकारचे रोबोट्स कार्यरत असतात. कोणी पीठ मळत असते, कोणी भाज्या, मांस कापत असते, कोणी रोबो पिझ्झा बेस बनवत असतो तर कोणी तयार पिझ्झा योग्य तापमानावरती बेक करत असतो. ग्राहकांना हव्या त्या स्वरूपात आणि हव्या त्या चवीत हा पिझ्झा बनवून घरोघरी पोचवला जातो. गाडी योग्य रस्त्याने चालवण्याचे कार्यदेखील रोबोट्सच करत असतात. 350 सेंसर्स 20 कॉम्प्युटर्सच्या मदतीने आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सवरती आधारले ‘क्रिएटर’ नावाचा रोबो शेफ तर सध्या तुफान लोकप्रिय आहे. एका तासात 120 बर्गर बनवणारा हा क्रिएटर त्याच्या हातच्या बर्गरच्या चवीने लोकांच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे. नुसता बर्गर बनवूनच क्रिएटर थांबत नाही, तर अगदी ग्राहकाच्या टेबलापर्यंत तो बर्गर पोचवूनदेखील येतो.