रोखठोक : राजकारण खतरनाक तितकेच बेभरवशाचे!

302

rokhthokदक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत राजकारणात उतरले. त्यांनी पाण्यावरचे तरंग पाहिले, पण तळ गाठणे कठीण आहे हे त्यांना समजले. ‘Politics is Dangerous’ असे ते म्हणाले. मोदी राममंदिर बांधत नाहीत व राहुल गांधी अचानक पितांबर नेसून महाकाल मंदिरात फेऱ्या मारू लागले!

‘‘Politics is Dangerous” असे श्री. रजनीकांत यांनी म्हटले आहे. राजकारण हे खतरनाक आहे. वाटते तितके सोपे नाही, असे दक्षिणेतील हा सुपरस्टार सांगतो. रजनीकांत यांनी सिनेमाच्या पडद्यावर अनेक ‘स्टंट’ केले, पण प्रत्यक्षात असे स्टंट चालत नाहीत हे त्यांनी सध्याचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून शिकायला हवे होते. तरीही रजनीकांतपासून कमल हसनपर्यंत अनेक नेते राजकारणात येत आहेत. आपल्या आधीच्या राज्यकर्त्यांनी काहीच केले नाही. त्यांनी केलेला खड्डा भरून काढण्यासाठी आपण राजकारणात येत आहोत असे प्रत्येकजण सांगतो तेव्हा आश्चर्य वाटते. गरिबीचे उच्चाटन करणे, रोजगार निर्माण करणे, तरुणांना संधी देणे, शेतकऱ्यांसाठी काम करणे हेच आपले प्राधान्य असल्याचे रजनीकांत यांनी एका मुलाखतीत सांगितले. यात नवे असे काय आहे? कमल हसन यांनी तामीळनाडूत एक स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला व जे रजनीकांत यांनी सांगितले ते सर्व कमल हसन यांनाही करायचे आहे. राजकारण उत्तम केल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, तरीही राजकारण धोकादायक असे रजनीकांत यांना वाटते.

महाराष्ट्राशी नाते
रजनीकांत हे मोठे अभिनेते आहेत. त्यांचे नाते महाराष्ट्राशी आहे. मूळचे ते शिवाजी गायकवाड; पण हे शिवाजीराव तामीळनाडूचे प्रश्न घेऊन राजकारणात उतरले. जन्मले महाराष्ट्रात, पण कर्मभूमी तामीळनाडू. ती कर्मभूमी हीच जन्मभूमी मानून रजनीकांत हे तेथील भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी उभे आहेत. दक्षिणेत रजनीकांत, कमल हसन, द्रमुकचे स्टॅलिन, आंध्रचे जगन रेड्डी व चंद्राबाबू, कर्नाटकात कुमारस्वामी हे प्रादेशिक पक्ष उद्याच्या राष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलतील. उत्तरेत अखिलेश यादव व मायावती यांचे एकत्र येणे पंतप्रधान होण्यापासून मोदींना रोखू शकते व महाराष्ट्रात शिवसेनेची साथ नसेल तर उद्याच्या संसदेत भाजप विरोधी बाकांवर बसलेला दिसेल हे चित्र आहे. तिकडे प. बंगालात ममता व ओरिसात नवीन पटनायक आहेतच. 2019 ला भारतीय जनता पक्ष हा लोकसभेतील मोठा पक्ष राहील; पण 2014 प्रमाणे ‘बहुमत’वाला पक्ष नसेल व ज्या काँगेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळू दिले नाही तो काँग्रेस पक्ष लोकसभेत निदान विरोधी पक्षपद तरी मिळवू शकेल हे आजचे चित्र आहे. राजकारण खतरनाक तितकेच बेभरवशाचे आहे असे रजनीकांत म्हणतात, पण त्यांनी राजकारणावरचे फक्त तरंग आणि बुडबुडेच पाहिले. राजकारणाचे पाणी खोल असते आणि त्याच्या तळाशी जे चालते ते पृष्ठभागावर कधीच येत नाही.

बेभरवशाचे राजकारण
राजकारण किती बेभरवशाचे आणि खतरनाक असते ते महाराष्ट्रात रोज दिसते. शिवसेनेतून श्री. नारायण राणे आधी काँग्रेसमध्ये व आता भाजपात गेले. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतले, पण राणे हे भाजपवरही नाराज आहेत व भाजपात राहणार नाहीत असे सर्वत्र प्रसिद्ध झाले. या बातम्या खोट्या ठरू नयेत याची काळजी शरद पवारांनी घेतली व ते राणे यांच्या कणकवली येथील घरी जेवायला गेले. श्री. पवार यांनी नेहमीप्रमाणे बाहेर येऊन सांगितले, ‘‘आमच्यात राजकीय चर्चा झालीच नाही.’’ हे राजकारणात सर्रास चालते. सोयीचे राजकारण आता सगळेच करतात. महाराष्ट्रात ‘युती’ व्हावी असे भारतीय जनता पक्षाला आज मनापासून वाटते. युती झाली नाही तर हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होईल, पण 2014 साली युती तोडली तेव्हा हिंदुत्वाचा विचार कुणाच्या डोक्यात आला नाही.

मातृभूमी नाहीच!
तेलंगणातील एका प्रचारसभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार भाषण केले. ‘‘निजामास पळवून लावले, तसे हैदराबादेतून ओवेसीला पळवून लावू,’’ असे त्यांनी सांगितले. यावर ओवेसी यांनी भगव्या कपड्यांतील योगींची यथेच्छ टवाळी केली व शेवटी म्हणाले, ‘‘ही माझी पितृभूमी आहे. वडिलांची भूमी आहे!’’ येथे पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला. ही माझी मातृभूमी आहे असे ओवेसी का म्हणाले नाहीत? मुसलमान या भूमीला मातृभूमी मानत नाहीत. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ला त्यांचा विरोध आहे आणि बेसावध क्षणीदेखील ते हिंदुस्थानचा उल्लेख ‘मातृभूमी’ असा करीत नाहीत, इतके ते याबाबत सतर्क असतात. ओवेसी यांनी ‘पितृभूमी’ हा शब्द वापरून मुसलमानांना पुन्हा बिथरवले आहे. राजकारण धोकादायक आहे ते असे!

राहुल बदलले
राजकारण हे धोकादायक, बेभरवशाचे हे आता राहुल गांधी यांच्या बाबतीतही खरे ठरले. मध्य प्रदेश निवडणूक प्रचारात राहुल गांधी हे उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेले. पितांबर, जानवे, कपाळास गंध, चंदन लावून अभिषेक केला व जणू विश्व हिंदू परिषदेचे नेतेच असल्याच्या रूपात त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. राहुल गांधी यांचे पूर्वज हे कसे मुसलमान होते अशा अफवा सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांना हे सर्व पाहताना धक्काच बसला आहे. भाजपने सत्तेसाठी जेथे हिंदुत्व सोडले त्या वळणावर राहुल गांधी पितांबर नेसून व कपाळास चंदन लावून उभे आहेत. अध्योध्येत राममंदिरही बांधू असे एकदा राहुल गांधी यांनी जाहीर करून टाकावे म्हणजे सगळाच खेळ खल्लास!

राजकारणात उद्या काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. रजनीकांत यांनी खरे तेच सांगितले.

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या