
देशाच्या राजकारणात कधी कोणते ‘नाणे’ चालवले जाईल याचा नेम नाही. आधी ‘कश्मीर फाईल्स’ व आता ‘केरला स्टोरी.’ देशाच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत. राजकारण धर्माच्या नावावर ईरेला पेटले आहे. अशा वेळी ‘केरला स्टोरी’चे राजकारण दुर्लक्षित करून चालणार नाही!
देशाच्या पटलावर कधी काय घडेल याचा नेम नाही. हा मजकूर प्रसिद्ध होईपर्यंत अनेक उलथापालथी झालेल्या असतील. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने ‘रोखठोक’ निकाल दिला आहे. घटनातज्ञ प्रा. उल्हास बापट यांचा या निकालाचे विश्लेषण करणारा लेख याच पानावर प्रसिद्ध केला आहे, तो पुरेसा बोलका आहे. शिंदे व फडणवीस काहीही म्हणोत, पण त्यांचे सरकारच अपात्र ठरवण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. रेल्वेचा एक अपघात झाला म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रातील मंत्री, राज्याराज्यांचे मुख्यमंत्री व मंत्र्यांना एखाद्या न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले म्हणून राजीनामे द्यावे लागले, पण महाराष्ट्रात सरकार बनविण्याची संपूर्ण प्रक्रियाच घटनाबाहय़ ठरवूनही शिंदे, फडणवीस खुर्चीला चिकटून बसले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्राची ही अप्रतिष्ठा आहे. कर्नाटकचा निकालही एव्हाना लागला असेल. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे प्रकरण गाजत आहे. कर्नाटकच्या निवडणुका हिंदू-मुसलमान मुद्दय़ांवर लढवता याव्यात म्हणून भाजपने बजरंगबलीपासून केरला स्टोरीपर्यंत अनेक पात्रे मैदानात उतरवली, हे बरे नाही!
‘द केरला स्टोरी’ काय आहे?
केरळातील 32 हजार मुलींना ‘लव जिहाद’ची शिकार बनवून त्यांचे धर्मांतर घडवले. त्यानंतर त्यांना ‘इसिस’सारख्या दहशतवादी संघटनेत सामील करून इस्लामी राष्ट्रांत लढण्यासाठी पाठवले. या सर्व मुली अफगाणिस्तान, सीरिया, इराण, इराकसारख्या राष्ट्रांत पाठवल्या. त्यांना अतिरेक्यांचे प्रशिक्षण दिले. अशी ही ‘केरला स्टोरी’ची कहाणी. विवेक अग्निहोत्रीने ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट काढला. कश्मीरात हिंदू पंडितांवरील अत्याचाराचे निर्घृण चित्र त्याने मांडले. भाजपने, मोदी-शहांनी त्या चित्रपटाचा वापर भाजपच्या प्रचारासाठी केला. मोदींसह सगळेच झुंडी झुंडीने ‘कश्मीर फाईल्स’ पाहायला गेले. महाराष्ट्रात श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पाहिला की नाही? पण त्यांनी वाजतगाजत ‘प्रोपोगंडा’ करत ‘केरला स्टोरी’ पाहिला आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वणवण भटकणाऱ्या, महाराष्ट्राला जाग आणण्यासाठी डफावर थाप मारणाऱ्या शाहिरांकडे पाठ फिरवली. मुख्यमंत्री शिंदे हे सातारचे. शाहीर साबळेंसारखी महान विभूती साताऱ्यात जन्मास आली व महाराष्ट्राच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान होते. शिवसेनेच्या जडणघडणीतही ते होते. याची माहितीही सातारच्या मुख्यमंत्री शिंदे यांना नसेल, पण ‘केरला स्टोरी’चे तुणतुणे वाजवत आज भाजपवाले फिरत आहेत.
नवी कश्मीर फाईल
‘द केरला स्टोरी’ ‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे वादग्रस्त ठरवली. हा संघाचा सरळ अजेंडा आहे. गुजरात दंगलीवर बनवलेल्या एका डॉक्युमेंटरी फिल्मवर भारतीय जनता पक्षाने बंदी घातली, पण त्याच वेळी ‘कश्मीर फाईल्स’, ‘केरला स्टोरी’सारख्या चित्रपटांचा प्रचार ते करीत आहेत. चित्रपटाचे कथानक निर्घृण आहे. भारतातून ‘इसिस’मध्ये सामील झालेल्या मुली किती निर्दयपणे लोकांच्या हत्या करतात, गळे चिरतात, कोथळे काढतात व त्या सगळय़ास हिंदू-मुसलमान असा रंग देऊन राजकीय पक्ष हिंदुत्वाच्या गर्जना करतात. मुळात केरळाची खरी स्थिती काय आहे? केरळात खरेच हिंदू व ख्रिश्चन मुली इस्लामच्या शिकार बनत आहेत का? 32 हजार हिंदू व ख्रिश्चन मुलींना ‘इसिस’मध्ये भरती केले यात तथ्य आहे काय? ‘लव जिहाद’च्या बहाण्याने फसलेल्या निरपराध मुलींना अमानुष हत्यारे बनण्यासाठी मजबूर केले गेले का? इराक, सीरिया, अफगाणिस्तानच्या मार्गाने पुढे सरकलेली ‘केरला स्टोरी’ ही खरेच वास्तव आहे का? हा सगळाच संभ्रम आहे.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अत्यंत स्पष्टच सांगितले, 32 हजार महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला व त्या अतिरेकी झाल्या असे कोणी सांगत असतील तर त्यांनी याबाबतचे पुरावे समोर आणावेत व माझ्याकडून 1 कोटी रुपये इनाम घेऊन जावे.
हे आव्हान कोणी स्वीकारेल काय?
सत्य घटना, नक्की?
‘केरला स्टोरी’ सत्य घटनेवर आधारित असल्याचे दिग्दर्शक सुदीप्तो सेनचे म्हणणे आहे. सत्य असेलही, पण ते इतके अमानुष पद्धतीने कसे दाखवता येईल? ‘कश्मीर फाईल्स’मध्येही तीच अमानुषता होती. ‘केरला स्टोरी’च्या दिग्दर्शकाचा दावा आहे, “32 हजार मुलींचे लव्ह जिहाद व धर्मांतर झाले. आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत.” सुदीप्तो सेन यांनी केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या एका मुलाखतीचा हवाला पुरावा म्हणून दिला. एका मुलाखतीत ओमान चंडी यांनी सांगितले होते की, केरळात प्रत्येक वर्षी 2800-3200 मुली इस्लामचा स्वीकार करतात. गेल्या 10 वर्षांत हा आकडा 32 हजारांवर गेला आहे. या मुली आतंकवादाकडे वळवल्या गेल्या हे कसे उघड झाले? अफगाणिस्तानात तालिबानची धर्मांध राजवट पुन्हा आली. तेव्हा तेथील तुरंगात चार भारतीय महिला कैदी मिळाल्या. तपासात उघड झाले की, या चारही महिलांना ‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी अफगाणिस्तानात पाठवले होते. आपापल्या पतीबरोबर या चारही महिला ‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी खुरासान प्रांतात पोहोचल्या, पण त्यांच्या नातेवाईकांनी हिंदुस्थान सरकारकडे विनंती केली की, त्यांच्या मुलींना ‘इसिस’च्या तावडीतून सोडवून हिंदुस्थानात आणा, पण हिंदुस्थान सरकारने ते मान्य केले नाही. त्यानंतर त्यांना अफगाणिस्तानातील तुरंगातच राहावे लागले.
ही ‘केरला स्टोरी’ची सारांश कथा आहे!
देशात राजकीय उलथापालथीची शक्यता आहे. सरकारे येतील व सरकारे गडगडतील. त्या सगळय़ा गदारोळात ‘केरला स्टोरी’ खरी की खोटी, हा प्रश्न अधांतरी राहू नये.
‘कश्मीर फाईल्स’ हा भाजपचाच प्रोपोगंडा चित्रपट होता. ‘केरला स्टोरी’ म्हणजे ‘कश्मीर फाईल्स’चीच पुढली पायरी!
पण या सगळय़ात राष्ट्रीय ऐक्य, सामाजिक सद्भावना कोठे हरवून गेली?
Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]