रोखठोक- रामलल्ला तंबूबाहेर निघाले! अयोध्येत पुन्हा कुबेर अवतरेल

6159

rokhthokअयोध्येत श्री रामलल्लांच्या नावे आता बँक खाते उघडले आहे. दानकर्ते त्यात भरभरून पैसा टाकतील. 24 तारखेला तंबूतल्या रामाचे स्थलांतर दुसऱया जागेत होईल. परिसरात इतकी वर्षे अंधारात असलेल्या देवांचेही स्थलांतर होईल. त्यामुळे वनवास सगळय़ांचाच संपेल. उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच एक कोटी दिले. कुबेर पुन्हा अयोध्येत अवतरेल असे चित्र दिसत आहे.

हाराष्ट्राचे मुख्यमंत्री अयोध्येत गेले. तेथे त्यांनी तंबूत विसावलेल्या श्रीरामाचे दर्शन घेतले. दर्शन घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘या जागेत वारंवार यावे असे वाटते. इथे आल्यावर एक वेगळय़ा प्रकारची ऊर्जा मिळते.’’

हे माझेही मत आहे. अयोध्येत जेव्हा जेव्हा शिवसेनेने पाऊल ठेवले, तेव्हा तेव्हा शिवसेना शंभर पावले पुढेच गेली हे सत्य नाकारता येत नाही. श्री. ठाकरे याआधी दोन वेळा कोणत्याही पदाशिवाय तेथे गेले. आता मुख्यमंत्री बनून अयोध्येत पोहोचले तेव्हा उत्तर प्रदेश सरकारतर्फे त्यांना प्रभू श्रीरामाच्या भूमीवर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. हा ऐतिहासिक क्षण अनुभवता आला व स्वतः उद्धव ठाकरे हे भावनाविवश झालेले मी पाहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्या आंदोलनाचे नेतृत्व केले. बाबरी पाडल्याच्या प्रकरणात ते आरोपी म्हणून लखनौच्या सीबीआय कोर्टात गेले तो एक दैवदुर्लभ सोहळा होता. सारे लखनौ शहर जणू त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले होते. त्याच शिवसेनाप्रमुखांच्या चिरंजीवांना उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या भूमीवर मानवंदना दिली.

मंदिर होत आहे!
अयोध्येत आता राममंदिर होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा तसा आदेश आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना झाली व रामलल्लाच्या मंदिरासाठी एक बँक खाते आता अयोध्येच्या स्टेट बँकेत उघडले आहे. श्री. उद्धव ठाकरे यांनी दोन प्रमुख घोषणा येथे केल्या. राममंदिरासाठी एक कोटी रुपये त्यांनी जाहीर केले. ही रक्कम सरकारी तिजोरीतून जाणार नाही, ती व्यक्तिगत स्वरूपात असेल. दुसरी घोषणा म्हणजे अयोध्येत महाराष्ट्र निवास उभे करण्याची. महाराष्ट्रातून शेकडो लोक अयोध्येत जात-येत असतात. त्यांची व्यवस्था यानिमित्ताने होईल. महाराष्ट्र निवाससाठी ‘ठाकरे सरकार’ उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडे रीतसर एका भूखंडाची मागणी करेल व तेथे महाराष्ट्राची वास्तू उभी राहील. दोन्ही घोषणा त्यादृष्टीने महत्त्वाच्या. अयोध्येवर महाराष्ट्राची छाप या दौऱयाच्या निमित्ताने पुन्हा पडली. श्रीराम हे वनवासात असताना नाशकात आले, तेथे पंचवटी उभी राहिली. विदर्भातील ‘रामटेक’ही रामाचेच स्थान. महाराष्ट्राचे एक नाते अयोध्येशी कायम राहिले. आधी बाळासाहेब ठाकरे व आता उद्धव ठाकरे यांनी ते अधिक घट्ट केले.

वनवासी देव
अयोध्येत राममंदिर म्हणून जो भाग सध्या आहे, तो एक कापडी तंबू आहे. त्या तंबूत सध्या रामलल्ला विसावले आहेत व शंभर फुटांवरून त्यांचे दर्शन घ्यावे लागते. संपूर्ण परिसरास जणू तिहार जेलचे स्वरूप प्राप्त झाले आहे व अनेक सुरक्षा अडथळे पार करून तंबूतील रामाचे दर्शन घ्यायला पोहोचावे लागते. हे सर्व चित्र उद्याच्या 24 मार्चनंतर बदलेल. मंदिर बनण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. चैत्र नवरात्रीच्या एक दिवस आधी 24 मार्चला तंबूतून रामलल्लास बाहेर काढले जाईल व नव्या जागेत विराजमान केले जाईल. त्यांच्यासाठी एक फायबरचे मंदिर निर्माण झाले आहे. तब्बल तीस वर्षांनंतर रामप्रभू तंबूतून बाहेर पडतील. त्याआधी ते मशिदीच्या गर्भगृहात होते. राममंदिराच्या आसपास असंख्य मंदिरे जुन्या पडक्या भिंतींसह आपापल्या देवदेवतांना सांभाळत उभी आहेत. आत नक्की कोणते देव आहेत हे बहुधा अयोध्यावासीयांनाही माहीत नसावे. या बंद मंदिरांतील देवांच्या प्रतिमांचेही आता स्थलांतर होईल व त्यांची स्वतंत्र प्रतिष्ठापना होईल. अशा प्रकारे बंद पडलेल्या मंदिरांतील मूर्तींचाही वनवास संपेल. अयोध्येतील बहुतेक मंदिरे, मठ जर्जर झाले आहेत, गढय़ा आणि महालांची रया गेली आहे. तेव्हा फक्त राममंदिराचाच नाही, तर संपूर्ण अयोध्येचाच जीर्णोद्धार यानिमित्ताने व्हायला हवा. मानस भवन, शेषावतार, साक्षी गोपाल, सीता रसोई, आनंद भवन, राम खजाना, विश्वामित्र आश्रम अशा अनेक मंदिरांची अवस्था बिकट आहे.

नवा रामदरबार
24 तारखेला तंबूतले श्रीराम रीतसर बाहेर पडतील. राममंदिराचे काम त्यानंतर सुरू होईल, रामजन्मभूमी ट्रस्टने संभाव्य दोन मजली मंदिराचा भव्य नकाशा समोर आणला आहे तो नेत्रदीपक आहे. तळमजल्यावर प्रत्यक्ष रामलल्ला विराजमान होतील, तर पहिल्या मजल्यावर ‘रामदरबारा’चे दर्शन होईल. कामास सुरुवात झाल्यापासून राममंदिर अडीच वर्षांत उभारले जाईल. मंदिराच्या शिला तयार करण्याचे काम 1991 पासूनच अयोध्येच्या रामघाटावर सुरू आहे. तेथील कार्यशाळेत 1 लाख घनफूट दगडांची ‘तराशी’ (घासकाम) पूर्ण झाली आहे. दोन मजली मंदिरासाठी अजून 75 हजार घनफूट ‘दगड’ तासले जाणार आहेत. रामजन्मभूमीवरील प्रस्तावित मंदिर 268 फूट लांब, 140 फूट रुंद आणि 128 फूट उंच असेल. मंदिराचा पहिला चौथरा 8 फूट उंच असेल. त्यावर प्रशस्त शिडीने पोहोचता येईल. त्यावर मंदिराचा 10 फूट लांब परिक्रमा मार्ग असेल. अग्रभाग, सिंहद्वार, नृत्य मंडप, रंग मंडप आणि गर्भगृह स्वरूपात मंदिराचे प्रमुख पाच भाग असतील. मंदिरात 212 खांब असतील. खांब 16 फुटांचे असतील. ज्या कक्षात रामलल्ला विराजमान होतील, त्यावर 16 फूट 5 इंचाचे दुसरे गर्भगृह असेल. त्यात भगवान श्रीराम राजाच्या स्वरूपात चार भाऊ, सीतामाई आणि हनुमानजी यांच्या बरोबर विराजमान असतील. या भव्य मंदिराचे बांधकाम नक्की कोण करणार? अनेक मोठ्या कंपन्या त्यांचे तंत्रज्ञान घेऊन पुढे आल्या आहेत. त्यात लार्सन टुब्रो कंपनी आघाडीवर आहे. कंपनी राममंदिर निर्माणाचे ठेकेदार म्हणून काम करणार नाही, तर सेवाभाव म्हणून मंदिराचे काम करणार आहे. हे सर्व आता अयोध्येत सुरू झाले आहे. 24 मार्चला प्रभू श्रीराम नव्या जागेत जातील. नव्या मंदिराचे काम त्यानंतर सुरू होईल.

असे येतील पैसे…
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंदिरनिर्माणासाठी तयार झाला. नृपेन मिश्र हे एकेकाळचे नोकरशहा त्याचे अध्यक्ष. मंदिरासाठी जगभरातून लोक दान देतील. हा व्यवहार पारदर्शक राहावा यासाठी ट्रस्टने काम सुरू केले आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांनी अयोध्या भेटीत एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. असे कोटय़वधी रुपये यापुढे गोळा होतील. अयोध्येतील स्टेट बँकेत ट्रस्टचे खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेत विदेशी मुद्रा खातेही उघडले जाईल. खाते उघडताच ते इंटरनेट बँकिंग सिस्टिमशी जोडले जाईल. त्यामुळे देश-विदेशातून कोणीही भक्त आपले दान या खात्यात जमा करू शकेल. पुढच्या मंगळवारपर्यंत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे खाते उघडले जाईल. तोपर्यंत रामलल्लांना पॅन नंबर मिळेल. दान देणाऱयांना हायटेक फीचर्सवाली रिसीट दिली जाईल. राममंदिरास पैसा कमी पडणार नाही हे नक्की. जगभरातील पर्यटक आग्र्यातील ताजमहाल पाहायला येतात तसे ते अयोध्येतील राममंदिर पाहायलाही यावेत अशा पद्धतीने हे राममंदिर भव्य वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून बनावे.

या कार्याला पैसे कमी पडणार नाहीत असे मी सांगतो ते यासाठीच की, अयोध्या नगरीस धनाचा राजा कुबेराचाही पदस्पर्श झाला होता. 70 एकर जागा नियोजित मंदिरासाठी अधिग्रहित होईल. येथेच राममंदिर होईल. याच परिसरात विवेचनी सभेने स्थापन केलेला ‘कुबेर टिला’ हा शिलालेख आहे. अयोध्येचा इतिहास स्पष्ट करणाऱया रुद्रयामल ग्रंथानुसार युगांपूर्वी येथे धनदेवता कुबेराचे आगमन झाले होते. कुबेरानेच राम जन्मभूमीजवळ उंच टेकडीवर भोलेबाबा लिंगाची स्थापना केली होती. नंतर येथे पार्वती, गणेश, कार्तिकेय, नंदी, कुबेरासहित सुमारे नऊ देवी-देवतांच्या मूर्ती स्थापन झाल्या. आता या स्थळास ‘नवरत्न’ परिसर म्हटले जाते. त्या सर्व नवरत्नांचाही आता जीर्णोद्धार होईल. रामलल्लांसाठी बँकेचे खाते अयोध्येत उघडले.

ते खाते भरभरून वाहू द्या. करसेवकांच्या रक्ताने शरयू लाल झाली होती. तो दिवस प्रत्येकाला आठवेल व त्यांचेही स्मरण व्हावे अशी एखादी ‘शिळा’ राममंदिर परिसरात उभी राहिली तर बरे. नाहीतर स्वातंत्र्यासाठी कधीही चरोटा न उठलेले जसे पुढे स्वातंत्र्यसैनिक बनले आणि खरे योद्धे कायम अंधारात राहिले. लढले कोण व बसले कोण, असे नेहमीचे राजकारण राममंदिरनिर्माणात तरी होऊ नये.

Twitter- @rautsanjay61
Email – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या