केकेआरचा बदला घेण्यास आरसीबी आतूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या साखळी लढतीत कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ कमालीचा आतूर झाला आहे. फॉर्ममध्ये परतलेला आरसीबी आणि पराभवाच्या चौकारामुळे गर्भगळीत झालेला केकेआर यांच्यात उद्या, 26 एप्रिलला बंगळुरूमध्ये परतीची लढत रंगणार आहे.

राजस्थान रॉयल्ससारख्या बलाढय़ संघावरील विजयाने आरसीबीच्या खेळाडूंचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. दुसरीकडे पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या ‘केकेआर’पुढे बंगळुरूचा विजयरथ रोखण्याचे आव्हान असेल. कोलकाता संघाने मागील काही लढतींत अतिशय निराशाजनक कामगिरी केलेली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर या संघाचे खेळाडू सपशेल अपयशी ठरत आहेत. सलामीच्या जोडीचा प्रश्न या वर्षीही कायम आहे. कर्णधार नितेश राणा चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. या संघातील फक्त व्यंकटेश अय्यरच्याच फलंदाजीत सातत्य आहे. जेसन रॉयने मागील लढतीत 26 चेंडूंत 61 धावांची खेळी केली होती. त्याच्याकडून केकेआरला अपेक्षा असतील. आंद्रे रस्सेल फलंदाजी व गोलंदाजीतही फ्लॉप ठरतोय. उमेश यादव, सुनील नरिन व वरुण चक्रवर्ती या गोलंदाजांची प्रतिस्पर्धी फलंदाजांनी धुलाई केली आहे. केकेआरच्या संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. या मॅचविनर खेळाडूंनी आपल्या लौकिकास  साजेसा खेळ केल्यास हा संघ आरसीबीपुढे आव्हान निर्माण करू शकतो.

दुसरीकडे फॅफ डय़ु प्लेसिस व विराट कोहली हे आजी-माजी कर्णधार फॉर्ममध्ये असल्याने बंगळुरूच्या संघात उत्साह आहे. मागील दोन सामन्यांतील विजयात या दोघांचेही योगदान आहे. शिवाय ग्लेन मॅक्सवेलही आता धुमाकूळ घालायला लागलाय. दिनेश कार्तिकची बॅट अजून चालताना दिसत नाहीये. गोलंदाजीत मोहम्मद सिराज वगळता इतर गोलंदाजांची निराशा हाच आरसीबीचा चिंतेचा विषय होय. मात्र तरीही या घडीला आरसीबीचा संघच केकेआरपेक्षा सरस वाटत आहे.