
विजयदुर्गमधील हाजी अली नौकेवर पाकिस्तानी नागरिक असून शेळ्यांची वाहतूक इराणमध्ये करीत असल्याचा खोटा मेसेज सोशल मिडियाद्वारे व्हायरल करून अफवा पसरविल्याबद्दल विजयदुर्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत, विजयदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 एप्रिलला विजयदुर्ग किल्ल्यासमोर समुद्रात हाजी अली जहाज आले. या जहाजावर पाकिस्तानी नागरिक आहे. तो उडवाउडवीची उत्तरे देत असून जहाजामधून शेळ्यांची वाहतूक इराणमध्ये होत आहे, असा खोटा मेसेज सोशल मिडीयाद्वारे व्हायरल करण्यात आला. हा मेसेज विजयदुर्गमधील नागरिक व पोलीस पाटील यांच्यापर्यंत पोहोचला.
अशा प्रकारे खोटा मेसेज सोशल मिडियाद्वारे व्हायरल केल्याप्रकरणी विजयदुर्ग पोलीस स्थानकाचे पो. कॉ. श्रीनाथ जयसिंग जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (ए) कलम 153 अन्वये अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास एपीआय भारतकुमार फार्णे करीत आहेत.




























































