ग्रामीण-शहरी रोजगाराचे आकडे चिंता वाढवणारे, ऑक्टोबर महिन्यात बेरोजगारीचा दर 6.98 टक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनलॉकच्या टप्प्यात देशातील आर्थिक व्यवहार आता हळूहळू सुरू झाले आहेत. अनलॉकमुळे रोजगाराच्या स्थितीत सुधार होईल असा अंदाज होता. मात्र सध्या तरी लोकांच्या हाताला पुरेसे काम मिळत नाही, असेच दिसत आहे.

देशातील ग्रामीण आणि शहरी भागांत बेरोजगारीचा दर ऑक्टोबर महिन्यात वाढला असून तो 6.98 टक्के झाला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीने (सीएमआयई) ही चिंता वाढवणारी आकडेवारी जारी केली आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण 6.67 टक्के होते. देशात कृषी क्षेत्र मजबूत असतानाही ऑक्टोबरमध्ये बेरोजगारी वाढली आहे. सप्टेंबर 2020च्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात बेरोजगारीच्या प्रमाणात 1.04 टक्के वाढ नोंद झाली आहे. रोजगाराच्या बाबतीत जुलै महिन्याचे आकडे चांगले होते. त्यानंतर आशा होती की, हळूहळू रोजगाराची स्थिती सुधारेल. मात्र ऑक्टोबरच्या आकडेवारीवरून निराशा पदरी आली आहे.

शहरात रोजगाराचा दिलासा

शहरी भागाने रोजगाराच्या बाबतीत काहीसा दिलासा दिला आहे. मागील महिन्यात शहरापेक्षा ग्रामीण भागात बेरोजगारी वाढल्याचे चित्र आहे.

सीएमआयईच्या आकडय़ांनुसार, ऑक्टोबर महिन्यात शहरी बेरोजगारीचे प्रमाण 7.15 टक्के नोंदवण्यात आले. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण 8.45 टक्के होते.

जीएसटी संकलनाने दिली उभारी

कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक मळभ निवळून देशाची अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2020 मध्ये एकूण जीएसटी संकलन एक लाख पाच हजार 155 कोटींच्या पातळीवर पोचले आहे.

या वर्षी फेब्रुवारीनंतर प्रथमच ऑक्टोबर महिन्यात एकूण जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांवर गेले आहे. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबरपर्यंत एकूण 80 लाख जीएसटीआर 3 बी विवरण पत्रे दाखल करण्यात आली आहेत.