याला म्हणतात इतिहासाचा सार्थ अभिमान

navnath-dandekar>> नवनाथ दांडेकर | मुंबई

आधुनिकतेच्या हव्यासापोटी ऐतिहासिक वास्तूंची तोडफोड करायची नाही हा बाणा रशियन फुटबॉल महासंघाने यंदाच्या २१व्या विश्वचषकाचे आयोजन करताना दाखवून दिला आहे. १९५७ मध्ये तत्कालीन सोविएत युनियन कालखंडात निओक्लासिकल स्थापत्य शैलीने एकाटेरीनबर्ग स्टेडियम उभारण्यात आले होते. या स्टेडिअमची प्रेक्षकक्षमता २३००० आहे.फिफाच्या निकषानुसार विश्वचषक फुटबॉल लढतीसाठी ती ३५००० असायला हवी होती.या निकषाला पात्र ठरण्यासाठी रशियन स्थापत्यतज्ज्ञांनी एक आगळी शक्कल लढवली आहे. त्यांनी या स्टेडियमच्या उघड्या प्रवेशद्वारासमोर ४५ फूट उंचीची तात्पुरती प्रेक्षक गॅलरी उभारून एकाटेरीनबर्गची प्रेक्षकक्षमता १२ हजारांनी वाढवण्याचा पराक्रम केलाय. याच स्टेडिअममध्ये शुक्रवारी ए गटातील इजिप्त विरुद्ध उरुग्वे हि शुभारंभी लढत खेळवण्यात आली .सुमारे १२००० फुटबॉल शौकिनांनी उघड्या आकाशाखाली नव्या प्रेक्षा गॅलरीत बसून या सामन्याचा आनंद लुटला. या स्टेडिअममध्ये ए ,एफ ,एच आणि सी गटांच्या विश्वचषक साखळी लढती खेळवल्या जाणार आहेत.

फिफाच्या निरीक्षकांनी एकाटेरीनबर्ग स्टेडियमच्या उघड्या भागात उभारलेल्या प्रेक्षक गॅलरीचे परीक्षण करून ती मजबूत व सुरक्षित असल्याचा निर्वाळाही स्पर्धेआधी दिला आणि रशियन संयोजकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मॉस्कोच्या एका स्थापत्य फर्मने हि तात्पुरती गॅलरी उभारण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. सोविएतकालीन इतिहासाचे रक्षण करीत फिफाचे निकष पूर्ण करण्याची रशियन फुटबॉल महासंघाची हि कृती निश्चितच स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे.ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचा रशियन बाणा जगातील अन्य देशांनीही शिकायला हवाय.

विश्वचषकानंतर एकाटेरीनबर्गला मूळचे स्वरूप
खंडप्राय रशियाचे एकाटेरीनबर्ग हे शहर आशिया खंडात वसलेले आहे. याच शहरात ऐतिहासिक एकाटेरीनबर्ग स्टेडियम उभारण्यात आले आहे.स्टेडियमच्या मूळ स्वरूपाला जराही धक्का न लावता रशियन बांधकामतज्ज्ञांनी तेथील प्रेक्षक क्षमता १२ हजारांनी वाढवली .आता स्टेडियमबाहेर उभारलेली प्रेक्षागॅलरी यंदाची विश्वचषक स्पर्धा संपल्यावर लगेचच काढून टाकली जाणार आहे.त्यामुळे पुन्हा हे स्टेडियम २३ हजार प्रेक्षक क्षमतेचे होणार आहे.स्थानिक उरल एकाटेरीनबर्ग फुटबॉल क्लबचे होमग्राउंड म्हणून या स्टेडियमचा वापर होणार आहे. एकाटेरीनबर्ग स्टेडियमच्या तात्पुरत्या नूतनीकरणासाठी १२.५ अब्ज रुबल्स (सुमारे १५०० लाख पौंड )इतका खर्च आला आहे.रशियातील २१व्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या १२ स्थळांपैकी एकाटेरीनबर्ग हे एकमेव आशियाई शहर आहे.

असे आहे नूतनीकरण झालेले एकाटेरीनबर्ग

मूळ बांधणी – १९५७
प्रेक्षा क्षमता – ३५६९६
शहर – एकाटेरीनबर्ग
क्षेत्रफळ – १०५ बाय ६८ मीटर्स
मैदान – गवताचे
दुसरे नाव – सेंट्रल स्टेडियम
नूतनीकरण खर्च – १२.५ अब्ज रुबल्स (सुमारे १५०० पौंड्स )

आपली प्रतिक्रिया द्या