सामना अग्रलेख – इडापिडा टळो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नावीन्याचा ध्यास घेतलेला दीपोत्सवाचा हा सण वर्षानुवर्षे, शतकानुशतके आनंदाची पखरण करतो आहे. सुखांची बरसात करतो आहे. घरातील प्रत्येक नात्याला सामावून घेणारा आणि आनंदाची उधळण करणारा दिवाळीचा सण अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे. घरोघरी उजळलेल्या पणत्यांच्या प्रकाशात कोरोनाचा काळोख नाहीसा होवो, इडापिडा टळो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो आणि दिव्यांच्या तेजोमयी प्रकाशात महाराष्ट्रातील व देशातील तमाम जनतेचे आयुष्य उजळून निघो, हीच या दीपोत्सवाच्या निमित्ताने मंगल मनोकामना!

तमाम मराठी जनतेचा आणि जगाच्या कानाकोपऱयात पसरलेल्या हिंदू धर्मीयांचा मंगलमय दीपोत्सव सुरू झाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील मानवजातीची गेली दोन वर्षे तशी अंधकारमय गेली. मागच्या वर्षीच्या दिवाळीत कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वत्र शुकशुकाट होता. तथापि, काळोखावर मात करून प्रकाशाची आणि चैतन्याची किरणे घेऊन येणाऱया दिवाळीच्या सणात यंदा मात्र उत्साहाचे मोठेच उधाण आले आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या संकटाची सावली अजूनही पाठलाग करत असली, तरी मोठय़ा प्रमाणावर झालेले लसीकरण आणि कोरोनाची कमी झालेली रुग्णसंख्या यामुळे जनतेच्या मनातील भय नाही म्हटले तरी कमी झालेले दिसत आहे. हे धोकादायक आहे, पण तरीही दिवाळीच्या उत्साहामुळे बाजारपेठांमध्ये गेले आठ-पंधरा दिवस तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. कोरोना आणि लॉक डाऊनमुळे व्यापारउदिम आणि उद्योगजगताचे गेल्या दोन वर्षांत मोठेच दिवाळे निघाले होते. मात्र, सुदैवाने कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने यंदा खरेदीदारांच्या गर्दीने बाजारपेठा गजबजल्या आहेत. त्यामुळे सलग दोन वर्षे अडचणीत काढणाऱया व्यापारी बांधवांचा आणि एकूणच

उद्योग जगताचा उत्साह

यंदाच्या दिवाळीने नक्कीच वाढविला आहे. संकटे येतात आणि जातात, पण त्यामुळे दिवाळीसारख्या सणाचे चैतन्य हरवून कसे चालेल? सुखाचे चार दिवस घेऊन येणाऱ्या या दीपोत्सवाचे म्हणूनच तर आज घरोघरी दणक्यात स्वागत होताना दिसत आहे. हिंदू धर्मीयांची घरे पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली आहेत. अंगणात आणि उंबरठय़ाबाहेर सुबक रांगोळ्यांची आरास मांडली जात आहे. आकाशकंदील सजले आहेत. दिवाळीच्या या मंगलमय प्रकाशपर्वात प्रत्येक कुटुंब हर्षोल्हासात न्हाऊन निघाले आहे. बच्चे कंपनीपासून थोरा-मोठय़ांपर्यंत सगळ्यांच्याच आनंदाला उधाण आणणाऱया दिवाळीच्या सणाची सारेच जण मोठय़ा आतुरतेने वाट पाहत असतात. फराळाच्या पदार्थांची रेलचेल आणि काही ना काही नवीन खरेदी, यामुळे सर्वांनाच प्रिय असलेला सण म्हणजे दिवाळी. रंगरंगोटी करून सज्ज झालेली घरे, कुटुंबातील सर्वांच्या सरबराईसाठी महिलावर्गाची सुरू असणारी लगबग, कामानिमित्त घरे सोडून अन्यत्र स्थिरावलेली मुले, सुना व नातवंडे गावी परतल्यामुळे आजी-आजोबांच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहता करतो तो दिवाळीचाच सण. म्हणूनच तर इतर कुठल्याही सणापेक्षा सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात, ती दिवाळीच्या सणाचीच. नवीन कपडे, नवे दागिने, नवीन वाहन, नवीन घर, नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ असा

नावीन्याचा ध्यास घेतलेला

दीपोत्सवाचा हा सण वर्षानुवर्षे, शतकानुशतके आनंदाची पखरण करतो आहे. सुखांची बरसात करतो आहे. मंगळवारी धनत्रयोदशीने दीपावलीचा प्रारंभ झाला. गुरुवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन दोन्ही एकाच दिवशी. त्यापाठोपाठ येतो तो साडेतीन मुहूर्तांपैकी असणारा बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याचा दिवस. नवे विक्रम संवत या दिवसापासून सुरू होते. म्हणून व्यापारीवर्ग जमा-खर्चाचे किर्द आणि नव्या वह्यांची पूजा करून या दिवसापासूनच आपले आर्थिक हिशेब सुरू करतात. विवाहित स्त्र्ायांनाही पाडव्याचे एक खास आकर्षण असते. पत्नी पतीला औक्षण करते आणि पती पत्नीला आकर्षक वस्तूंची ओवाळणी घालतो. अलीकडच्या काळात बरीच कुटुंबे एकत्र येऊन पाडव्याच्या सणाचा उत्साहाने आनंद लुटतात. भावांना ओवाळण्यासाठी आतूर झालेल्या बहिणी हक्काने भावांकडून ओवाळणी घेतात. घरातील प्रत्येक नात्याला सामावून घेणारा आणि आनंदाची उधळण करणारा दिवाळीचा सण अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे. घरोघरी उजळलेल्या पणत्यांच्या प्रकाशात कोरोनाचा काळोख नाहीसा होवो, इडापिडा टळो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो आणि दिव्यांच्या तेजोमयी प्रकाशात महाराष्ट्रातील व देशातील तमाम जनतेचे आयुष्य उजळून निघो, हीच या दीपोत्सवाच्या निमित्ताने मंगल मनोकामना!