
प. बंगालच्या सिलीगुडीमध्ये एका गरीब पित्याने शववाहिकेसाठी पैसे नाहीत म्हणून मुलाचा मृतदेह पिशवीत लपवून बसने प्रवास केला. हजारो अब्जाधीशांच्या श्रीमंत देशातील गरिबीचे हे चित्र मन विषण्ण करणारे आहे. आपल्याच एका देशबांधवावर गरिबीमुळे ओढवलेली ही वेळ म्हणजे राजकारण चिवडण्याची नव्हे, तर राष्ट्रीय शरमेची गोष्ट आहे. गरिबीचा शाप व कलंकामुळे हे घडले. श्रीमंतांसमोर मुजरे झाडणारे राज्यकर्ते, धोरणकर्ते गरिबीचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी काही करतील काय?
गरिबी व दारिद्रय़ हा समस्त मानवजातीला लागलेला कलंक आहे आणि विपन्नावस्थेचा हा शाप हिंदुस्थानच्या तर पाचवीलाच पुजलेला आहे. पुन्हा एखाद्या कुटुंबावर कमालीचे दारिद्रय़ ओढवले असेल तर ती गरिबी एखाद्या माणसाला काय करायला लावेल, याचा काही नेम नाही. ‘बघा, जागतिक क्षितिजावर हिंदुस्थानची मान आता कशी ताठ झाली आहे,’ असे आपल्या देशातील राज्यकर्ते कितीही उच्चरवात सांगून आपणच आपली पाठ थोपटून घेत असले तरी गरिबीमुळे हृदय पिळवटून टाकणाऱया करुण कहाण्या जेव्हा समोर येतात, तेव्हा संपूर्ण देशवासीयांची मान शरमेने खाली झुकते. पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम बंगालच्याच कालियागंज भागात राहणाऱया आशिम देबशर्मा या गरीब व्यक्तीचा मुलगा आजारी पडल्यामुळे या पित्याने पदरमोड व उसनवार करून सिलीगुडी येथील सरकारी रुग्णालय गाठले. देबशर्मा यांच्या पाच महिन्यांच्या बाळावर उत्तर बंगाल वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांसाठी जमवलेले सोळा हजार रुपये आठवडाभरात औषधपाण्यावर खर्च झाले. सोबत आणलेले पैसेही संपले आणि शनिवारी रात्री या बाळाचाही मृत्यू झाला. आता दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या कालियागंजला परत कसे जायचे आणि बाळाचा मृतदेह गावी कसा न्यायचा, असा प्रश्न या गरीब पित्यापुढे उभा राहिला. सरकारी निर्णयानुसार 102 हा आकडा डायल केला की, मोफत रुग्णवाहिकेची सुविधा मिळते; मात्र ही सुविधा केवळ उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांपुरतीच मर्यादित आहे. मरण पावलेल्या रुग्णांचे शव वाहून नेण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध नाही. मुलाच्या मृत्यूने
शोकविव्हल झालेल्या पित्याला
रुग्णवाहिकेच्या चालकाने हे उत्तर दिले व मुलाचे शव गावी घेऊन जावयाचे असल्यास 8 हजार रुपयांचा खर्च येईल, असे सांगितले. मुलाच्या औषधोपचारात सारी पुंजी खर्च झाल्यामुळे हतबल झालेल्या पित्याने शववाहिकेचा नाद सोडला व मुलाचा मृतदेह सार्वजनिक बसने गावाकडे नेण्याचा निर्णय घेतला. आशिम देबशर्मा यांनी 5 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह एका पिशवीत टाकला आणि पिशवीतील मुलाचा निप्राण देह बसमधील अन्य प्रवाशांना दिसणार नाही, याची काळजी घेत सिलीगुडी ते कालियागंज हा प्रवास पूर्ण केला. बसमधील प्रवाशांना आपल्यासोबत मृतदेह असल्याचे कळाले तर ते आपल्या बसमधून उतरवतील, अशी भीती या गरीब पित्याला वाटत होती. त्यामुळे या संपूर्ण प्रवासात त्याने कुणालाही सुगावा लागू दिला नाही. दुसऱया दिवशी एका हिंदी वेबसाईटने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प. बंगालमध्ये हलकल्लोळ उडाला. त्यावरून राजकीय चिखलफेक सुरू झाली. एका गरीब पित्याने आपला मुलगा गमावला. पैसे नसल्याने त्याचा मृतदेह लपूनछपून बसने गावी परत आणावा लागला. गरिबीच्या शापामुळे त्या पित्याला हृदयावर दगड ठेवून मृतदेह पिशवीत आणण्याचे जे पाऊल उचलावे लागले, ते पाहून प्रत्येक संवेदनशील मनातून केवळ आक्रंदनाचेच हुंदके उमटायला हवेत. ते सोडून त्यावरून जी राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली, ती दुर्दैवीच म्हणायला हवी. एकीकडे आपण जागतिक महासत्ता होण्याच्या बाता मारतो, आर्थिक महासत्ता होणार असल्याच्या गमजा मारतो आणि दुसरीकडे रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्यामुळे आपल्याच देशातील गोरगरीब जनता कुटुंबीयांचे मृतदेह खांद्यावरून नेताना दिसते. गरिबीबरोबरच आरोग्य यंत्रणांची दुरवस्था आणि गैरसोयींमुळे होणाऱया मृत्यूच्या घटना या केवळ प. बंगाल किंवा बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यातच घडतात असे नक्हे, तर
महाराष्ट्रासारखे प्रगत राज्यही
याला अपवाद नाही. अलीकडेच मुरबाडच्या ओजीवली गावातील सरपंच बारकाबाई हिलम यांना व त्यांच्या जावयाला साप चावला. पण शहराकडे येण्यास रस्ता नसल्याने त्यांना उपचारासाठी पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यांचा तडफडून मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथेही अशीच भयंकर घटना घडली. मर्कटवाडीतील एका महिलेची प्रसूती होऊन तिला जुळी मुले झाली, परंतु रुग्णालयात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ती दोन्ही अर्भके उपचारांअभावी मरण पावली. पालघर जिल्ह्यातच धर्मीचा पाडा येथील दर्शना फरले या गर्भवती महिलेला रस्त्याअभावी ग्रामस्थ झोळीत टाकून आरोग्य केंद्रात नेत असताना वाटेत झोळीतच तिची प्रसूती झाली आणि डोळ्यादेखत तिच्या बाळाचा मृत्यू झाला. डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथील एका महिलेलाही वेळीच उपचार न मिळाल्याने तिच्यासह तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यात पातेल्यात बसून नदी ओलांडणाऱया विद्यार्थ्यांचा तर बीडच्या पाटोद्यात थर्माकोलवरून जीवघेणा नदीप्रवास करून शाळेत जाणाऱया मुलांचा व्हिडीओ मागे समोर आला होता. मेळघाट वगैरे आदिवासी भागात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू आजही आपण थांबवू शकलो नाही. गरिबीबरोबरच आरोग्य यंत्रणा, दळणवळण व्यवस्था आणि सरकारी अनास्थेमुळे हे हकनाक बळी जात असतात. दुर्गम भागातील मुले नद्या-नाले ओलांडून शाळेत जाताना दिसतात. ग्रामीण भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते. प. बंगालच्या सिलीगुडीमध्ये एका गरीब पित्याने शववाहिकेसाठी पैसे नाहीत म्हणून मुलाचा मृतदेह पिशवीत लपवून बसने प्रवास केला. हजारो अब्जाधीशांच्या श्रीमंत देशातील गरिबीचे हे चित्र मन विषण्ण करणारे आहे. आपल्याच एका देशबांधवावर गरिबीमुळे ओढवलेली ही वेळ म्हणजे राजकारण चिवडण्याची नव्हे, तर राष्ट्रीय शरमेची गोष्ट आहे. गरिबीचा शाप व कलंकामुळे हे घडले. श्रीमंतांसमोर मुजरे झाडणारे राज्यकर्ते, धोरणकर्ते गरिबीचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी काही करतील काय?

























































