शतक ठोकलं, ‘सामनावीर’ही झाला; तरी सचिन ढसाढसा रडला, 24 वर्षांपूर्वीची सल आजही मनात कायम

टीम इंडियाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन जवळपास 10 वर्षांचा कालावधी उलटला आहे. वानखेडे मैदानावर अखेरचा सामना खेळत सचिनने क्रिकेटला अलविदा केला. क्रिकेटमध्ये विक्रमांचे इमले रसणाऱ्या सचिन तेंडुलकर याच्या मनात आजही 24 वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये घडलेल्या एका प्रसंगाची सल कायम आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 28 ते 31 जानेवारी 1999 दरम्यान चेन्नईत कसोटी सामना खेळला गेला होता. वसीम अक्रम पाकिस्तानचा, तर मोहम्मद अझरुद्दीने हिंदुस्थानचा कर्णधार होता. अत्यंत रोमांचक झालेला हा सामना हिंदुस्थानने अवघ्या 12 धावांनी गमावला होता. या लढतीत सचिन तेंडुलकर याने शतक ठोकले होते आणि त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. मात्र हातातोंडाशी आलेला सामना गमवावा लागल्याने सचिन तेंडुलकर ढसाढसा रडला होता.

पाकिस्तानने पहिल्या डावात 238 धावा केल्या होत्या. मोईन खान आणि मोहम्मद युसूफने अर्धशतक ठोकले होते. अनिल कुंबळेने 6 विकेट घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. यानंतर हिंदुस्थानचा पहिला डावही 254 धावांमध्ये आटोपला. हिंदुस्थानकडून सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने अर्धशतक ठोकले होते.

दुसऱ्या डावात इंझमाम-उल-हकच्या शतकी खेलीड्या बळावर पाकिस्तानने 286 धावा उभारल्या आणि हिंदुस्थानपुढे विजयासाठी 271 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानचे पाच खेळाडू अवघ्या 82 धावांमध्ये माघारी परतले होते. पराभव समोर दिसत होता, मात्र सचिन तेंडुलकर याने नयन मोंगियाला हाताशी धरत धावांता रतिब सुरू केला. पाहता-पाहता हिंदुस्थानची धावसंख्या 200 पार पोहोचली.

विजय दृष्टीपथात आला होता. सचिन तेंडुलकर याने शतक ठोकले आणि नयन मोंगियाने अर्धशतक ठोकले. परंतु अर्धशतकानंतर मोंगिया झटपट बाद झाला. 6 बाद 218 अशी हिंदुस्थानची हालत झाली होती. त्या परिस्थितीतही सचिनने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत धावफलक हलता ठेवला. हिंदुस्थानला विजयासाठी 17 धावांची आवश्यकता असताना सचिन बाद झाला आणि त्यानंतर अवघ्या चार धावांमध्ये पुढील 3 खेळाडू बाद झाले. हिंदुस्थानला 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.