
सामना ऑनलाईन । लखनौ
भाजपविरोधात महाआघाडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टीने जबरदस्त धक्का देत येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 जानेवारी रोजी म्हणजेच शनिवारी अखिलेश यादव व मायावती या एकत्ररित्या लखनौ येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत हे दोन्ही नेते आघाडीची अधिकृत घोषणा करतील. 2014 च्या लोकसभा आणि त्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची झालेली वाताहत पाहून सपा व बसपाने काँग्रेसला आघाडीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सपा आणि बसपा दोघांशी बोलणी करून त्यांना महाआघाडीमध्ये सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील होती. मात्र या निवडणुकीसाठी बसपा व सपाने आघाडी करत प्रत्येकी 37 जागा वाटून घेतल्या आहेत. उरलेल्या जागा या अपक्षांसाठी किंवा आघाडीला पाठिंबा देणाऱ्या इतर पक्षांसाठी राखून ठेवल्या आहेत. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उत्तर प्रदेशात फक्त दोन जागांवर विजय मिळाला होता. रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी आणि सोनिया गांधी विजयी झाल्या होत्या. या दोन्ही जागांवर सपा आणि बसपा आपले उमेदवार द्यायचे नाहीत असं ठरवण्याची शक्यता आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये सपा,बसपा व काँग्रेसला जोरदार फटका बसला होता. त्या निवडणुकीत हे तीनही पक्ष वेगवेगळे लढले होते. यात काँग्रेसला 2 तर सपाला 8 जागा मिळाल्या होत्या. मायावती यांचा पक्ष भोपळाही फोडू शकला नव्हता.



























































