बिहारच्या समस्तीपूर येथे भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. समस्तीपुर जिल्ह्यातील मुसरीघरारी परिसरात एक बस उलटून 30 भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  नेपाळहून भाविकांनी भरलेली बस झारखंडच्या देवधर येथे जात होती. दरम्यान शनिवारी रात्री मुसरीघरारी चौकाजवळ राष्ट्रीय महामार्ग 28 वर अचानक ही बस उलटली आणि यामध्ये 30 भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तत्काळ समस्तीपुर रुग्णालयासह अन्य जणांना जवळच्या दवाखान्यात दाखल केलेय. अचानक बसचा एक्सेल तुटल्याने हा अपघात झाला आहे. सध्या या अपघाताचा तपास सुरु आहे.