
अनैतिक प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या 6 वर्षाच्या चिमुकल्याचा आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना सांगली जिल्ह्यातील लेंगरे तालुकातील खानापूर येथे उघडकीस आला आहे. मुलाच्या अपहरणाचा बनाव करून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले असून एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. विटा पोलिसांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे (वय – 28, रा. लेंगरे) व तिचा प्रियकर रुपेश नामदेव घाडगे (वय -25, रा. जोंधळखिंडी ता. खानापूर) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती लोंढे या विवाहितेचा तिच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असणाऱ्या रुपेश घाडगे या तरुणावर जीव जडला होता. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये अनैतिक संबंध आहेत. ज्योतीला शौर्य नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे. ज्योती आणि रुपेश यांना लग्न करायचे होते, मात्र या लग्नामध्ये चिमुरड्या शौर्य अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी संगनमताने त्याचा काटा काढायचे ठरवले.
6 मे रोजी शौर्यचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद ज्योतीने पोलिसात दिली. दुसरीकडे रुपेशने त्याला दुचाकीवरून नेऊन एका विहिरीत फेकून दिले. ज्योतीच्या फिर्यादीवरून विटा पोलिसांचा तपास सुरू झाला. एका विहिरीत शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस तपासात ज्योती आणि रुपेशच्या अनैतिक संबंधांची माहिती पुढे झाली.
पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला नकार देणाऱ्या दोघांनाही पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी शौर्यच्या खुनाची कबुली दिली. सध्या दोघांची चौकशी सुरू असून या घटनेमुळे खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस उपाधीक्षक पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक पांडुरंग कणेरी या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला.


























































