
सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा 2024-25चा 823 कोटी रुपयांचा आणि 29 कोटी 53 लाख शिलकीच्या अर्थसंकल्पास आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेत मान्यता दिली. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ अथवा दरवाढ केली नाही. शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांवर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे.
आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी सभेत मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांनी अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सादर केला. यावेळी नगर सचिव चंद्रकांत आडके, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त वैभव साबळे आदी अधिकारी उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात ई- बससेवा, पर्यावरणपूरक अंत्यविधी व्यवस्था करणे, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे, श्वान निर्बीजीकरण, निवारा केंद्र उभारणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, खेळाडू दत्तक योजना, तृतीयपंथीय यांच्यासाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी सक्षमीकरण योजना, मॉडेल स्मार्ट स्कूल योजना, पर्यावरण अहवाल तयार करणे, ड्रोनद्वारे वृक्षगणना, ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण, सांगलीतील उत्पादनाचे जीओ टॅग करणे, कर्मचाऱयांसाठी जिओ फेसिंग, सिटी सर्व्हे क्षेत्राचे सर्वेक्षण करणे, सफाई कर्मचारी यांच्यासाठी मॉडेल हजेरी शेड बांधणे, रणगाडा आणि शौर्य स्मारक उभारणे, मनपा हद्दीतील पाणीपुरवठा 58 पंपांचे ऑडिट करणे, माधवनगर रेल्वे ब्रीज अंडरपाससाठी निधी, पत्रकार भवन उभारणे, अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी एसएमकेसी क्लब उभारणे आदी प्रमुख योजना आणि संकल्प यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.
हा अंतिम अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंजूर केला. यंदाचे अंदाजपत्रक मंजूर करत असताना, यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही.

























































