
सांगली जिह्यातील ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आज ईश्वरपूर येथील राजारामबापू साखर कारखान्याच्या आत घुसत थेट स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाच्या गाळपासाठी असणाऱया गव्हाणीत उडय़ा मारल्या. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांचा दबाव झुगारत ऊसकाटा बंद पाडला.
ईश्वरपूर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याचे गाळप ठप्प झाले आहे. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कारखान्याच्या वजन काटय़ासमोर आंदोलन सुरू होते. आज सकाळी अकरा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. या दरम्यान कारखाना प्रशासन व राजू शेट्टी यांच्यातील ऊसदराची चर्चा फिस्कटल्याने ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी पोलिसांचा दबाव झुगारून सरळ गेटच्या आत प्रवेश करीत ऊसगाळपाच्या गव्हाणीत उडय़ा मारल्या, यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. या आंदोलनामुळे आज सकाळपासून कारखान्याचे गाळप बंद पडले.
राजारामबापू कारखान्याच्या वजन काटा गेटसमोर राजू शेट्टी हे स्वतः ठाण मांडून बसले असून, आता या ठिकाणी मंडप घालण्याबरोबर जेवणाची व्यवस्था केली. योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका शेट्टी यांनी घेतली. अवकाळी नुकसानाची पाहणी करणाऱया जयंत पाटीलांनी शेतकऱयांबाबत मगरीचे अश्रू ढाळू नयेत, अशी टीकाही शेट्टींनी केली.
कर्जतमध्ये शेतकऱयांनी दूध रस्त्यावर ओतले
कर्जत ः तालुक्यातील कुळधरण येथे दूध दरवाढ व ऊसदर जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने कर्जत-श्रीगोंदा राज्य मार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱयांनी रस्त्यावर दूध ओतत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे अनिल चव्हाण यांनी केले. यावेळी लालासाहेब सुद्रिक, अशोक जगताप, अमोल जामदार यांच्यासह मोठय़ा संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

























































