
सामना प्रतिनिधी। संग्रामपूर
परप्रांतातील रेती घाट मालकांकडून बनावट रॉयल्टी पासेस आणून त्याद्वारे जिल्ह्यातील नद्यांमधील रेतीची वाहतूक करणार्या वाळू माफीयांना प्रतिबंध घालण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी मध्यप्रदेशातील बुरहाणपूर जिल्हाधिकारी यांना एक लेखी पत्र लिहले आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील रेती वाहतूक करणार्या वाहनांना इलेक्ट्रॉनिक्स वाहतूक पास देण्यावर प्रतिबंध घालावा अशी विनंती केली आहे.
जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव आणि नांदुरा या तीन तालुक्यात रेती माफियांनी बुरहाणपूर जिल्ह्यातील दर्यापूर राय, ता. नेपानगर येथील रेती घाटाच्या मालकांकडून इलेक्ट्रॉनिक्स वाहतूक पास मिळवून दिवसाढवळ्या रेतीची वाहतूक सुरु केली होती. महसूल अधिकार्यांनी त्या वाहनांची तपासणी केली असता त्यांचे मालकांजवळ दर्यापूर राय ता. नेपानगर जि. बुरहाणपूर येथील रेती घाट मालकांकडून मिळालेल्या पासेस आढळून आल्यात. मात्र, वाहनात असलेली वाळू रेती ही जिल्ह्यातीलच नद्यांमधील असल्याचे आढळून आले. वाहतूक पास असल्याने महसूल अधिकार्यांना पकडलेली आणि चौकशीत घेतलेली (पोलिसांच्या ताब्यात दिलेली) वाहने सोडून द्यावी लागली. यात काही महसूल अधिकार्यांनी प्रचंड नामुस्की झाली. याबाबत शेगाव येथील तहसीलदार यांनी जिल्हाधिकार्यांना सविस्तर अहवाल पाठविला होता. त्याची आणि वृत्तपत्रातील (प्रामुख्याने सामना) बातम्यांची दखल घेवून बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी नुकतेच एक पत्र बुरहाणपूर जिल्हाधिकारी यांना पाठविले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.
केंद्र शासनाचा गौण खनिज (विकास व विनीयमन) कायदा एक असला तरी वाळू रेती निर्गती बाबत राज्यनिहाय वेगवेगळे शासन निर्णय आहे. त्यानुसार वाळू निर्गती धोरण ठरविण्यात आले आहे. तसेच रेती निर्गतीचा कालावधी संपला त्यामुळे रेतीची निर्गती करणे बंद आहे. महाराष्ट्रातील व्यक्तीस व वाहनास मध्यप्रदेश राज्यातील इलेक्ट्रॉनिक्स वाहतूक पास मिळण्यावर आपले एनआयसी मार्फत प्रतिबंध घालण्यात यावा. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील वाहनांकरिता वाहतूक पाल्य देण्यात येवू नये. याबाबत संबंधित ठेकेदारास व आपल्या जिल्ह्यातील संबंधित तहसीलदारांना सूचित करावे अशी विनंती या पत्रातून केली आहे.
मागील महिन्यात येथील तहसीलला रुजू झालेले तहसीलदार पवार यांनी रेती तस्करी विरुद्ध जी कारवाई केली. त्या सर्व कारवायात याच पावत्या (पासेस) वाहन मालकांनी वाहणे पकडल्यावर, पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर साहेबांना ‘सादर’ केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांच्या ताब्यातील सर्वच वाहनांना सोडून देण्यात आले आहे. याबाबत तालुक्यात विविध उलट सुलट चर्चेला ऊत आला होता. त्यामुळे येथील तहसीलदारांना पत्रकारांनी ‘रडार’वर घेतले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख दाणे यांनी यासर्व कारवायांची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा केली. जिल्हाधिकार्यांच्या पत्रामुळे अलीकडे पकडल्या गेलेल्या काही वाहन मालकांची ‘बुरहाणपूरची पास’ असून सुद्धा गोची झाली आहे. बुरहाणपूर जिल्हाधिकारी काय अभिप्राय देतात याकडे जाणकारांचे लक्ष घातले आहे.
































































