संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी, भरपावसात जम्मूत राहुल गांधींसोबत पदयात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे आज जम्मू येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. जम्मूत आज पाऊस पडत आहे. मात्र पावसातही राहुल गांधी व संजय राऊत हे पदयात्रा करत आहेत.

संजय राऊत हे गुरुवारी जम्मू येथे पोहोचले आहेत. गुरुवारी त्यांनी जम्मूमध्ये आयुक्त कार्यालयाबाहेर गेल्या 250 दिवसांपासून आंदोलन करणाऱया कश्मिरी हिंदू कर्मचाऱयांची यांनी भेट घेतली. यावेळी कश्मिरी हिंदू पंडितांनी छत्रपती शिवाजी महाराज, भवानी आई आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष केला.

दहशतवाद्यांपासून बचावासाठी कश्मीरातून बदली करा, अशा मागणीसाठी गेल्या 250 दिवसांपासून कश्मिरी हिंदू कर्मचारी आंदोलन करत आहेत. पाकिस्तानच्या चिथावणीवरून 1990 मध्ये दहशतवाद्यांनी कश्मीर खोऱयातून हिंदूंना हुसकावून लावण्यासाठी हत्यासत्र घडवले होते. पण आता 1990 ची पुनरावृत्ती कश्मीरात होऊ देणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

उद्धव ठाकरे यांचा फोन

संजय राऊत हे आंदोलनस्थळी असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केला. कश्मिरी पंडितांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्या समस्या आपण कशा सोडवू शकतो याबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच कश्मिरी पंडितांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी आश्वस्त केल्याचे राऊत यांनी सांगितले.