
ओला, उबेर आणि रॅपिडोच्या माध्यमातून राज्यात ‘बाईक टॅक्सी’ सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी त्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो मराठी रिक्षाचालकांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असून हा निर्णय त्यांना आत्महत्येकडे ढकलणारा आहे, असा आरोप करत संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिले आहे. मराठी रिक्षाचालकांच्या पोटावर मारू नका, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
नाशिक दौऱ्यावर असताना 16 ऑगस्ट रोजी शेकडो मराठी तरुणांनी आपली भेट घेतली. त्यातील बहुतांश तरुण रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते चिंताग्रस्त होते. राज्यात असे लाखो तरुण आहेत. सरकार रोजगार देत नसल्यामुळे त्यांना दिवसरात्र रिक्षा चालवावी लागते. आता रॅपिडो टॅक्सी सुरू करण्याच्या परिवहन विभागाच्या निर्णयाचा मोठा फटका अनेक शहरांतील पर्यटन स्थळांवरील रिक्षाचालकांना बसणार आहे. त्यामुळे रिक्षाचालक भयभीत झाले आहेत, असे संजय राऊत यांनी त्या पत्रात म्हटले आहे.
मंत्र्यांच्या दहीहंडीला देणगी दिल्यामुळेच रॅपिडोला परवानगी
‘रॅपिडो’ या कंपनीशी राज्यातील काही मंत्र्यांचे आर्थिक व व्यावसायिक संबंध आहेत, असाही गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. ‘रॅपिडो’ने काही मंत्र्यांच्या दहीहंडी, गणेशोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रायोजकत्व स्वीकारत आतापर्यंत कोटय़वधींची देणगी दिल्याचे दिसत आहे. काहींना निवडणुकीसाठीदेखील निधी दिला आहे. त्याची परतफेड म्हणूनच त्यांनी ‘रॅपिडो’ला हजारो रिक्षाचालकांच्या छाताडावर बसवल्याचे दिसते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मूळ पेशा ‘रिक्षाचालक’ असा असताना या राज्यात रिक्षाचालकांची रोजीरोटी हिरावून घेणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
परिवहन मंत्री भेटही देत नाहीत, आंदोलनासही परवानगी नाकारली
या प्रश्नाबाबत रिक्षाचालकांच्या संघटनांना परिवहन मंत्र्यांची भेट नाकारली जाते. 10 ऑगस्ट रोजी त्यांनी नाशिक ते मंत्रालय असा रिक्षाचालकांचा धडक मोर्चा काढण्याचेही ठरवले होते. परंतु त्यांना परवानगी नाकारली गेली. सरकार लोकशाही मार्गानेही रिक्षाचालकांना त्यांच्या समस्यांना वाचा फोडू देत नाही हे चिंताजनक आहे. ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी रिक्षाचालक संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासह तातडीने बैठक घेण्यासाठी आपल्याला वेळ दिला जावा, योग्य वेळ व ठिकाण कळवावे, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रात केली आहे.

























































