बजेटपूर्वीच्या हलव्यातील एक चमचा हलवादेखील मुंबईच्या वाट्याला आला नाही! संजय राऊत यांची सडकून टीका

केंद्र सरकारने बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून मुंबई-महाराष्ट्राला काय मिळालं असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. मु्ंबई, महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल देशाला मिळतो. याच महसुलातून देशाचे बजेट सादर करण्यात आले. अर्थसंकल्पाच्या आधी अर्थखात्यात जो हलवा तयार करतात, त्यातला चमचाभर हलवादेखील मुंबईच्या हातावर ठेवला नाही. मग सर्वाधिक महसूल देणाऱ्या मुंबई-महाराष्ट्राला यंदाच्या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं ? असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. ते दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी म्हटले की, ‘गेल्या काही वर्षांपासून मुंबई-महाराष्ट्राचे आर्थिक-औद्योगिक दृष्ट्या अधपतन करण्याचे कारस्थान सुरू आहे आणि हे कालच्या बजेटमध्ये पुन्हा दिसले. पंतप्रधान मुंबईत वारंवार यायला लागले आहे, केंद्रीय मंत्र्यांच्या टोळधाडी येत आहेत. उपमुख्यमंत्री मोठमोठ्या घोषणा करत आहे, मात्र या घोषणा मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत आहेत. पंतप्रधान एका महिन्यात 2 वेळा मुंबईला येत आहे, पण येताना मुंबईसाठी काय आणत आहे,काय देत आहेत ? हा एक रहस्यमय विषय आहे. पंतप्रधान मुंबईत येत आहेत, आम्ही त्यांचे मुंबईत नेहमी स्वागतच केले आहे, मात्र येताना मुंबईसाठी काहीतरी घेऊन या. रिकाम्या हाताने येता आणि झोळी भरून घेऊन जाता हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि हे मुंबईचे दुर्दैव आहे.

अदानी समूहाबाबतचा हिंडेनबर्ग कंपनीने मांडलेल्या अहवालानंतर देशाच्या आर्थिक विश्वात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करणार का असे विचारले असता राऊत म्हणाले की, विरोधी पक्षनेते खर्गे यांच्या दालनात लोकसभा आणि राज्यसभेच्या नेत्यांची बैठक होणार आहे. गेल्या 50 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा देशात घडला नव्हता. या घोटाळ्यात सत्ताधारी पक्षाचा थेट संबंध आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडी,सीबीआय ज्या पद्धतीने धाडी घालत आहे, त्यामध्ये मनी लॉण्ड्रींग शेल कंपन्या दाखवल्या जातात, मग जे प्रकरण समोर आलं आहे उद्योगपतीचे त्यात सिंगापूर, मॉरीशसमध्ये शेल कंपन्या आहेत, मनी लॉण्ड्रींग भाजपच्या नेत्यांनी आतापर्यंत यावर आवाज का उठवला नाही, केंद्रीय तपास यंत्रणांनी आतापर्यंत याबाबत हालचाल का केली नाही, का या तपासयंत्रणा फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यासाठीच निर्माण झाल्या आहे का ? हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे, याला वाचा फोडण्याचे काम संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाकडून केले जाईल.