गुंतवणूक येऊन खरोखर रोजगार मिळेल तेव्हा मत व्यक्त करू! संजय राऊत यांची प्रतिक्रिया

राज्याचे मुख्यमंत्री दावोस इथे सुरू झालेल्या जागतिक आर्थिक मंचामध्ये सामील होण्यासाठी पोहोचले असून महाराष्ट्रात 1 लाख 36 हजार कोटींची गुंतवणूक येणार असल्याचे तिथून जाहीर करण्यात आले. याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, दावोसला जी गुंतवणूकदारांची वार्षिक जत्रा भरते त्यातून काहीतरी सवालाख कोटी आणणार आहेत. ती आली, उद्योगांची पायाभरणी झाली, लोकांना रोजगार मिळेल तेव्हा आम्ही त्यावर मत व्यक्त करू.

मुंबईमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, फक्त 3 दिवसांत असे करार झाले असतील आणि 1 लाख 36 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात खरोखर येणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याहीपेक्षा आमच्यासाठी गंभीर गोष्ट अशी आहे की अडीच लाख कोटींची गुंतवणूक जी महाराष्ट्रात होणार होती ती आमच्या डोळ्यासमोर निघून गेली. त्यासंदर्भात ना मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले, ना उपमुख्यमंत्र्यांनी केले, ना उद्योगमंत्र्यांनी केले. दावोसला जी गुंतवणूकदारांची वार्षिक जत्रा भरते त्यातून काहीतरी सवालाख कोटी आणणार आहेत. ती आली, उद्योगांची पायाभरणी झाली, लोकांना रोजगार मिळेल तेव्हा आम्ही त्यावर मत व्यक्त करू. आता जर खरोखर काही यश आलं असेल तर आम्ही स्वागत करू.

निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीबाबत राऊत म्हणाले की, शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात तरी निर्माण होत नाही. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना, शिवसेना एकच आहे.