
अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. अयोध्येत होत असलेला हा कार्यक्रम हा संपूर्ण देशाचा नसून एका राजकीय पक्षाचा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. प्रभू श्रीरामाला यांनी एका प्रकारे किडनॅप केलं आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की, “भाजप कोण आलीय राम ललाचे आमंत्रण देणारी. देव स्वत: भक्तांना बोलावत असतो. भक्तहे देवाच्या दरबारात स्वत: जात असतात. भाजपचा हा राजकीय कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जाऊ अयोध्येला. राजकारण करणाऱ्यांचे ना रामाशी नाते आहे ना रामाच्या विचाराशी नाते आहे. हा चुनावी जुमला आहे. त्यांना करायचे ते करू द्या.”
‘देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कवडीचेही योगदान नाही ते हिंदुस्थानच्या संसदेचे उद्घाटन करतात, अयोध्येच्या संघर्षात ज्यांचे योगदान नाही ते आज सगळ्यात पुढे आहेत. राजकारण हे असे आहे. भाजपला वाटत असेल की ते पवित्र काम करत आहे, तर ते तसे नाहीये. या देशाचे संस्कार आणि संस्कृती त्याला मान्यता देत नाही.’ असे राऊत यांनी म्हटले.
























































